वाहनांची तपासणी नको, नियमानुसार कारवाई करा! पोलीस आयुक्तांचे वाहतूक पोलिसांना निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनांना थांबवून त्यांची तपासणी करत बसू नका. त्यामुळे वाहतूककोंडी होणार नाही याची खबरदारी घ्या. वाहतुकीचे नियमन करण्यास प्राधान्य द्या, असे निर्देश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

वाहतूक अंमलदार हे रस्त्यावरील वाहनांना थांबवून त्या वाहनांची तपासणी करतात. यामुळे वाहतूककोंडी होऊन नागरिकांना विनाकारण मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. वाहतूक नियमांचे भंग करणाऱया वाहनाविरुद्ध मोटार वाहन कायदा व नियमावलीतील तरतुदीनुसार कारवाई करा, पण त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे वाहनांना थांबवून त्यांची तपासणी करू नका, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच संयुक्त नाकाबंदीच्या वेळेसदेखील वाहतूक विभागाचे अंमलदार हे केवळ वाहतूक नियमांबाबतची कारवाई करतील.

त्याशिवाय कोणत्याही वाहनाची तपासणी करणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे. असे असतानाही या सूचनांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहतूक विभागाच्या प्रभारी पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल असेही आयुक्तांनी खडसावले आहे.