कारचालकाने पोलीस हवालदाराला गाडीखाली चिरडल्याची घटना दिल्लीतील नांगलोई परिसरात घडली. यात पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. गाडी चालवणारा व्यक्ती हा मद्य पुरवठादार असल्याची माहिती सांगितली जात असून तो सध्या फरार आहेत. दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नांगलोई पोलीस ठाण्यात असलेले पोलीस हवालदार संदीप यांना एका गाडी बेदरकारपणे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एक कार भरधाव येत असल्याचे संदीप यांना दिसले. संदीप यांनी त्याला कार हळू चालवण्याचा इशारा केला, परंतु कारचालकाने त्यांना जोराची धडक दिली आणि तब्बल 10 मीटरपर्यंत फरफटत नेले. यानंतर पुन्हा पुढे असलेल्या दुसऱया एका कारला त्याने धडक दिली. त्यानतंर पोलीस हवालदार संदीप यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पश्चिम विहार येथील दुसऱया एका रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस हवालदार संदीप हे एका लेनमध्ये डावीकडे वळले आणि भरधाव कारला वेग कमी करण्याचा इशारा दिला, मात्र कारचालकाने अचानक वेग वाढवला आणि संदीप यांच्या दुचाकीला जोराची धडक देत दुचाकीसह 10 मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत संदीप यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. संदीप हे 30 वर्षांचे होते. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.