
ऊसतोड कामगाराकडून 10 हजारांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नेवासा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. पोलीस नाईक सोमनाथ अशोक कुंढारे असे अटक केलेल्याचे नाव आहे.
संभाजीनगर जिह्यातील कन्नड येथील एका व्यक्तीचा मध्यंतरी अपघात झाला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी अपघाताचा तपास असलेल्या नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सोमनाथ अशोक कुंढारे यांच्याकडे अपघातातील कागदपत्रे मागितली होती. यासाठी कुंढारे याने 15 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. बुधवारी पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताना पथकाने कुंढारे याला पकडले.





























































