अवैध दारु विक्रीचे धंदे पोलिसांनी केले उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

जिल्ह्याच्या वेगवेगळ्या विभागात अवैध दारु विक्री करणाऱ्यांविरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या दोन दिवसात धाडी टाकून १७ गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील बारा आरोपींना अटक करण्यात आली असून जवळपास दोन लक्ष रुपयांचा माल जप्त केला आहे.

नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारु विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अवैध दारु विक्री करणाऱ्यावर धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या या कारवाईमध्ये ५५ लिटर देशीदारु, १७५ हातभट्टी दारु, ९० लिटर ताडी आणि हजारो लिटर दारु बनविण्याचे रसायन जप्त केले आहे. अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या व्यक्तींचे तीन वाहने जप्त करण्यात आली असून पाच आरोपी मुद्देमाल सोडून पसार झाले. या प्रकरणी बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध देशीदारु व अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरुध्द यापुढे अशाच पध्दतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सांगडे यांनी दिली आहे.