पोलीस डायरी – कुलाब्यात माफियारा; गुंडांच्या नांग्या ठेचणारे पोलीस सत्ताधाऱ्यांपुढे नतमस्तक

>> प्रभाकर पवार
[email protected]

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर हे गाव सोलापूर-विजापूर महामार्गावर वसलेले असून या गावाला नगर पंचायत दर्जा प्राप्त झालेला आहे. या गावात आतापर्यंत बिनविरोध निवडणुका पार पडलेल्या आहेत, परंतु गेल्या नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गटाच्या) उज्ज्वला थिटे यांनी विरोध केला. भाजपचे अनगर गावचे सर्वेसर्वा राजन पाटील (माजी आमदार) यांच्या वर्चस्वाला आव्हान दिल्यामुळे राजन पाटील यांचे समर्थक चिडले. त्यांनी पाच वर्षांपूर्वी नवरा गमावलेल्या उज्ज्वला थिटे यांची चोहोबाजूने कोंडी केली. आपल्या अल्पवयीन मुलासह एकट्याच घरात राहणाऱ्या उज्ज्वला थिटेंच्या घरावर रात्री-अपरात्री दगडफेक करून त्यांना तेथे राहणे मुश्कील करून टाकले. त्या पुण्यात आपल्या बहिणीच्या घरी जाऊन राहिल्या तेव्हा तर त्यांचे घरच फोडून घरातील सर्व सामान पळवून नेण्यात आले. एक कपबशीही घरात ठेवली नाही. तरीही त्या महिलेने हार मानली नाही. तिने पोलिसांची मदत घेऊन नगराध्यक्षपदाचा अर्ज भरायचे ठरविले, परंतु स्थानिक पोलिसांनी राजकीय दबावाखाली त्यांच्याशी असहकार पुकारला तेव्हा त्या पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना भेटल्या. त्यांनी उज्ज्वला थिटे यांना सहकार्य करायचे कबूल केले तरीही बिनविरोध १७ सदस्य निवडून आणणाऱ्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी तिला रस्त्यात वाहतूक अडथळे आणून नगर पंचायत कार्यालयापर्यंत पोहोचू दिले नाही. तरीही त्या महिलेने जिद्द सोडली नाही. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. “आपण लोकशाही संपवत आहात. तिची हत्या करीत आहात” असा आरोप या महिलेने शासकीय अधिकाऱ्यांवर केला तेव्हा या अधिकाऱ्यांनी त्यांना ५० पोलिसांचे संरक्षण दिले आणि पहाटे ५ वाजता या महिलेने पोलीस संरक्षणात नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला, परंतु या धाडसी महिलेच्या अर्जातल्या त्रुटी काढून तो बाद ठरविला. या महिलेने अर्ज दाखल करू नये म्हणून त्यांना काही करोडोंची ऑफरही देण्यात आली, परंतु या स्वाभिमानी महिलेने ती धुडकावून लावली. १८ सदस्यांच्या या नगर पंचायतीमध्ये १७ सदस्य धाकदपटशा व लालच दाखवून निवडून आणण्यात आले, परंतु १८ वा नगराध्यक्षपदाच्या विरोधी पक्षाच्या उज्ज्वला थिटे या सदस्याला सत्ताधारी विकत घेऊ शकले नाहीत.

मुंबईतही असाच प्रकार घडला. ३१ डिसेंबरपूर्वी कुलाब्याच्या २२६ क्रमांकाच्या वॉ र्डमध्ये तीन वेळा निवडून आलेल्या भाजपच्या मकरंद नार्वेकर या धनाढ्य नगरसेवकाविरुद्ध तेजल दीपक पवार या महिलेने अर्ज भरायचे ठरविले तेव्हा तिला बरीच प्रलोभने दाखविण्यात आली. पती दीपक पवार यास तेजल हिने अर्ज न भरण्यासाठी ५ कोटी व फ्लॅटची ऑफरही देण्यात आली, परंतु दीपक पवार यांनी ती धुडकावून लावली. माझ्या उच्चशिक्षित पत्नीला निवडणूक लढवायची आहे, समाज सेवा करायची आहे असे ठामपणे सांगून ऑफर धुडकावून लावली. भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांचे बंधू तसेच महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनीही तेजल पवारला फोनवरून समजविण्याचा प्रयत्न केला. अर्ज भरू नये अशी विनंती केली, परंतु सभापतींच्या विनंतीलाही तेजल पवारने भीक घातली नाही. प्रकरण गंभीर झाल्याचे लक्षात आल्यावर तेजल पवार हिने अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांची व पोलिसांची मदत घेऊन उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर आपले आणि मुलांचे काही तरी बरे-वाईट केले जाईल या भीतीने ती मुंबईबाहेर निघून गेली. मुंबईतून अक्षरशः तिला पळ काढावा लागला अशी वेळ कधी कुठल्या महिला उमेदवारावर मुंबईत आली नव्हती. कुलाबा मतदारसंघातून नार्वेकर कुटुंबीयांनी दोन-तीन उमेदवार उभे केले आहेत. त्यातील मकरंद नार्वेकर हे महापौरपदाचे उमेदवार असल्याचे सांगण्यात येत असून त्यासाठीच कुलाबा मतदारसंघातील बऱ्याच उमेदवारांना भीती दाखवून पैसे देऊन अर्ज मागे घेण्यास लावले गेले, परंतु तेजल पवार या महिलेने बिनविरोध निवडीचा प्रयत्न हाणून पाडला.

सत्ताधाऱ्यांनी मुंबई सोडून ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच उर्वरित महाराष्ट्रातून ७० च्या वर सदस्य बिनविरोध नगरपालिकेवर निवडून आणले असे कधी झाले नव्हते. पैसे वाटून, आमिषे दाखवून राजकीय पुढाऱ्यांनी यापूर्वी निवडणुका जिंकल्या, परंतु बिनविरोधाचा हा फंडा देशाला विनाशाकडे नेणारा वाटत आहे. पोलीस किंवा सरकारी यंत्रणा या केवळ नामधारी आहेत. पंख छाटलेल्या पक्ष्यासारखी त्यांची सध्याची अवस्था झाली आहे. कुलाब्याच्या तेजल पवारला जेव्हा भीतीने घर सोडावे लागले तेव्हा त्यांच्या पतीने पोलिसांकडे लेखी तक्रार केली, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. ठाणे, डोंबिवली. कल्याण मतदारसंघांत तर सत्ताधाऱ्यांनी पत्रक वाटताना खुलेआम पैशांचे, नोटांचे वाटप केले तरीही त्यावर कारवाई नाही. कोणताही बडा माफिया स्वतः कुठल्या हिंसक गुन्ह्यात सहसा भाग घेत नाही. त्यांचे जे समर्थक असतात तेच आपल्या म्होरक्याच्या नावाने सर्वत्र आतंक पसरवित असतात. आपल्या देशात सध्या तेच सुरू आहे. मुंबईत असे कधी झाले नव्हते, परंतु कुलाब्यासारख्या श्रीमंत लोकवस्ती असलेल्या मतदारसंघात एका सामान्य महिलेला आपले अपहरण होईल म्हणून घरातून पळून जावे लागते आणि तरीही पोलीस कारवाई करीत नाहीत तेव्हा असे वाटते की, गुंडांच्या नांग्या ठेचणाऱ्या पोलिसांच्या नांग्या सत्ताधाऱ्यांनी ठेचल्या आहेत की काय? सत्ताधाऱ्यांपुढे ते नतमस्तक झाले आहेत की काय? बिनविरोध निवडीसाठी सत्ताधारी आपल्या लाडक्या बहिणींनाच पळवून लावत असतील तर लोकशाहीसाठी हे फारच घातक आहे. महिलांवर अत्याचार करून पोलिसांच्या, शासकीय यंत्रणांच्या मदतीने निवडणुका जिंकल्या जाणार असतील तर भविष्यात लोकशाही शिल्लकच राहणार नाही असे सामान्यजन बोलत आहेत. कुलाब्यातील माफियागिरीला, धनाढ्य उमेदवारांना मतदार १५ जानेवारी रोजी नक्कीच अद्दल घडवतील एवढे नक्की!