पोलीस डायरी – कधी सुलतानी, कधी अस्मानी; आता कोरोनाची त्सुनामी!

1020

>> प्रभाकर पवार

‘कोरोना’च्या भीतीने सारी मानवजात मरणावस्थेत आहे. एकदाचे मरण आलेले चालेल, पण आमची सध्याच्या ‘लॉक डाऊन’मधून सुटका करा, अशी प्रार्थना देवाकडे बहुसंख्य भयभीत जनता करीत आहे. यापूर्वीच्या लोकांनी लढाया, कत्तली, लुटालूट हे अंगावर काटा उभा करणारे सुलतानी अत्याचार पाहिलेत! वादळे, भूकंप, अग्निप्रलय, नद्यांचे महापूर, अतिवृष्टी ही अस्मानी संकटेही! प्लेग, इन्ल्फूएन्झासारखे महाभयंकर रोग अजूनही साऱयांच्या लक्षात आहेत. साऱया जगाला भयभीत करून सोडणारा ‘कोरोना’सारखा हा व्हायरस गेल्या पन्नास वर्षांत कुणा हिंदुस्थानी नागरिकांनी अनुभवला नव्हता. उलट प्लेग, इन्ल्फूएन्झासारख्या तापाने आपल्या देशात लाखोंचे बळी गेले आहेत. परंतु आज कोरोनानेही जगभरात आपल्या नावाची दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे काही लोक कोरोनाची लागण होण्यापूर्वीच भीतीने गचकत आहेत. जगभरात 43 हजारांच्या वर लोक कोरोनाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडले आहेत.

आज आपल्या देशात जातीय दंगलीत लाखोंचे बळी गेले आहेत. अगदी ब्रिटिश काळापासून आपल्या देशाला जातीय दंगलीची लागण आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारण्याच्या कारणावरूनही दंगली झाल्या आहेत. लहान मुलांचे लचके तोडणाऱया, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱया कुत्र्यांनाही मारायचे नाही. असे आता नव्हे तर शंभर वर्षांपूर्वीचे प्राणीमित्रही म्हणत होते. त्यावेळी झालेल्या दंगली काळजाच्या ठोका चुकविणाऱया होत्या. माणसंच माणसांचे जीव घेत होती. आता ‘कोरोना’वरून जातीय दंगली उसळल्या तर त्यात कोणी आश्चर्य वाटू घेऊ नये. कारण लोक अजिबात ऐकत नाहीत. प्रार्थनेच्या नावाखाली गर्दी करून स्वत:सह सर्वांचा जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांना विनाकारण आव्हान देत आहेत. अशी सद्याची मुंबईसह आपल्या देशाची परिस्थिती आहे.

मुंबई शहर हे अत्यंत संवेदनाक्षम शहर आहे. या मुंबईची सुमारे दीड कोटी लोकसंख्या आहे. एक जरी ठिणगी पडली तरी त्याचा विस्फोट होऊ शकतो. परंतु ज्या मुंबईकरांनी 1984 साली विशेषत: 1992 ची दंगल बघितली आहे. ते पाहता कुणी जरी समाजकंटकांनी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. 1993 च्या महासंहारक बॉम्बस्फोटानंतर समाजकंटकांचा जातीय दंगल उसळविण्याचा कट होता. परंतु मुंबईकरांनी दाखविलेल्या संयमामुळे तो फसला. 1993 च्या बॉम्बस्फोटात 300 च्या वर लोकांनी आपले प्राण गमावले, तर 700 लोक गंभीर जखमी होऊन आयुष्यातून उठले. एकाच दिवशी 12 साखळी बॉम्बस्फोट व इतका मोठा महासंहार मुंबईकरांनी कधी पाहिला नव्हता. तरीही तिसऱया दिवशी लोकांनी स्पिरीट दाखविले. घराबाहेर पडून ते आपापल्या कामाला लागले. मुंबई पुन्हा उजाळून निघाली. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर आतापर्यंत मुंबईमध्ये छोटे-मोठे 100 बॉम्बस्फोट घडविण्यात आले. मुंबई रेल्वेतील 2006 सालचे सीरियल बॉम्बस्फोट तर न विसरता येण्यासारखे आहेत. प्रथम वर्गाच्या पश्चिम रेल्वेच्या 7 डब्यांत घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात 186 रेल्वे प्रवाशांचे बळी गेले. छिन्नविछिन्न झालेले मृतदेह अंगावर काटा उभा करणारे होते. तेव्हाही मुंबई थांबली नाही. या सुलतानी आक्रमणानंतर मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसच्या अधिकाऱयांनी अनेकांना पकडले. त्याचे मूळ शोधून काढले. तेव्हा कुठे मुंबईतील बॉम्बस्फोट मालिका थंडावल्या, परंतु थांबल्या मात्र नाहीत. 26/11 रोजी तर मुंबईसह सगळे विश्व हादरून गेले. पाकिस्तानी अतिरेक्यांनी ताज, ऑबेरॉय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नरीमन हाऊस आदी ठिकाणी हल्ले करून 170 जणांचे बळी घेतले. त्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, उपायुक्त अशोक कामटे, पोलीस निरीक्षक विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकाऱयांचाही समावेश होता.

संघटित गुंड टोळय़ांच्या अतिरेक्यांच्या आव्हानाला सामोरे गेलेल्या मुंबईकरांनी अनेक अस्मानी संकटचाही मुकाबला केला आहे. 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये काय झाले होते? या दिवशी सारी मुंबई पावसात डुंबली होती. प्रत्येकजण प्राण वाचविण्यासाठी धडपडत होता. पावसाने थैमान घातले होते. तो साऱयांच्या डॉयनासॉरसारखा हात धुवून मागे लागला होता. त्यादिवशी अगदी दुमजली बसही वाहून गेल्या. गाडीचे लॉक उघडता न आल्याने काहींनी आपल्या कारमध्येच प्राण सोडले. काहींना आपल्या घरातच जलसमाधी घेतली. प्रदीप सीताराम निंबाळकर व मालुसरे नावाचे दोन पोलीस शिपाई वाहून गेले. त्यात मालुसरे या शिपायाचा शेवटपर्यंत मृतदेह आढळला नाही. या एकाच दिवशी पावसाने 500 जणांचे बळी घेतले होते. पावसाचे असे रौद्र रूप मुंबईकरांनी यापूर्वी कधी पाहिले नव्हते. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांना सामोरे जाणाऱया मुंबईकरासमोर आता कोरोना नावाच्या एका 400 मायक्रो सूक्ष्म व्हायरसचे आव्हान उभे राहिले आहे. त्या व्हायरसला घाबरून जाण्याचे कारण नाही. आमचे पोलीस, डॉक्टर्स, नर्स व अत्यावश्यक सेवेत मोडणारे आमचे सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा पाडाव करण्यासाठी व कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. असे असताना व सरकारने आवाहन केले असताना स्वत:चा व आपल्या कुटुंबियांचा जीव वाचविण्यासाठी कुणीही 14 एप्रिलपर्यंत घराबाहेर पडू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर रोजच आपल्याशी संवाद साधून आपणास मार्गदर्शन करीत आहेत. त्याची दखल घ्या आणि घराबाहेर पडू नका. नेहमीप्रमाणे हे अस्मानी संकट नव्हे, कोरोनाची ही त्सुनामी अस्मानी संकटापेक्षाही तुम्हाला भयभीत करणारी आहे. त्यामुळे कोरोनाचा नायनाट लवकर होईल यासाठी आपण प्रार्थना करूया!

आपली प्रतिक्रिया द्या