
>> प्रभाकर पवार
पायल सलमान तडवी या विवाहित डॉक्टर तरुणीने 22 मे 2019 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मुंबईतील नायर रुग्णालयाच्या वसतिगृहामधील आठव्या मजल्यावरील 806 क्रमांकाच्या निवासामध्ये आपल्या ओढणीचा गळफास (सिलिंग पंख्याला) लावून आत्महत्या केल्यानंतर साऱ्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज जगभरात दर एका मिनिटाला एक तरी आत्महत्या केली जाते. वर्षाला आठ लाख व्यक्ती जीवनाला कंटाळून हे जग सोडून जातात. त्यात हिंदुस्थानी नागरिकांची संख्या अधिक असून 25 ते 30 वयोगटातील स्त्र्ााr-पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. पायल ही तिशीतीलच होती. पायलचे 2016 साली सलमान तडवी या जळगावच्या तरुणाशी लग्न झाले होते. मुंबईच्या कुपर रुग्णालयात सलमान असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करीत होता. तो भूल देणारा ऍनास्थेटिस्ट (Anaesthetist) डॉक्टर आहे. दोघंही वेगवेगळे सरकारी वसतिगृहात राहत होते. हा विरह संपावा म्हणून हे दोघेही पती-पत्नी नायर रुग्णालयाजवळच भाडय़ाने घर घेऊन एकत्रपणे राहणार होते, परंतु नियतीला हे मान्य नव्हते. नवीन भाडय़ाच्या घरात जाऊन एकत्र राहण्याचे पायलचे स्वप्न तिच्या कनवाळू स्वभावामुळे भंगले. नायर रुग्णालयात डॉ. पायलचे वरिष्ठ असलेल्या भक्ती अरविंदराव मेहरे (26, राहणार वरड, जि. अमरावती), हेमा सुरेशकुमार आहुजा (28, राहणार मध्य प्रदेश), अंकिता कैलास खंडेलवाल (26, राहणार अकोला, महाराष्ट्र) या तीन डॉक्टर तरुणींच्या जाचाला कंटाळून पायलने आत्महत्या केली. तेव्हा जळगावच्या जिल्हा परिषद कार्यालयात अधीक्षक असलेल्या अबेदा या तिच्या आईला व जिल्हा परिषद कार्यालयात ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या सलीम या तिच्या वडिलांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी मुलीला तळहातावरील फोडासारखी जपली. तिला डॉक्टर बनविण्यासाठी आदिवासी (भिल्ल) समाजातील या माता-पित्यांनी जिवाचे रान केले, परंतु ते व्यर्थ ठरले. पायलच्या एका आत्मघातकी निर्णयामुळे तिच्या आईवडिलांना धक्का बसला. रॅगिंगचा (छळ करण्याचा) आरोप असलेल्या त्या तीन तरुण अविवाहित डॉक्टर महिलाही आयुष्यातून उठल्या. त्यांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली.
पायल ही जरी जळगावची असली तरी तिचे वैद्यकीय शिक्षण सांगलीच्या मिरज मेडिकल कॉलेजमध्ये 2016 साली पार पडले. त्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर 2018 साली ती मुंबईत आली. तिने नायर रुग्णालयात पदव्युत्तर (PG) शिक्षणासाठी गेल्या वर्षीच्या मे महिन्यात ऍडमिशन घेतले, परंतु केवळ वर्षभरात नायर रुग्णालयात तिचे करीयर संपले. भक्ती, हेमा व अंकिता या तीन वरिष्ठ डॉक्टर तरुणी पायलकडून काम करून घेण्यासाठी तिला टॉर्चर करायच्या. वरिष्ठांच्या सततच्या टोमण्यांमुळे पायल वैफल्यग्रस्त झाली होती. तिने आपल्या आईवडील व पतीच्याही हे सारे कानावर घातले होते. लेखी तक्रारही तयार केली होती. परंतु तिचा पती सलमानच तिला म्हणाला, तक्रार जर रेकॉर्डवर आली तर तुला त्याचा अधिक त्रास होईल. त्यामुळे द्विधा मनःस्थितीत असलेल्या पायलने लेखी तक्रार मागे घेतली. तिथेच घात झाला. पायलने तक्रार मागे घेतली आणि स्वतःच जिवानिशी गेली. स्त्र्ााrरोगतज्ञ म्हणून उदयाला आलेली पायल ही भिल्ल समाजातील पहिलीच डॉक्टर होती, परंतु तिने वरिष्ठांशी लढायचे सोडून त्यांच्यापुढे शरणागती पत्करली.
सरकारी रुग्णालयात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रकार दुर्मिळ आहे. त्यामुळे पायलच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी मुंबई गुन्हे शाखेतर्फे सुरू आहे. पायल ही भिल्ल आदिवासी समाजातील असल्यामुळे हे आत्महत्या प्रकरण फारच संवेदनाक्षम झाले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी मानवी वृत्ती सर्वत्र सारखीच असते. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा असो. दुर्बलांचे खच्चीकरण करणारे सर्व समाजात आहेत. पायल जर मनाने कमकुवत, मृदू नसती, ती आक्रमक, दांडग्या स्वभावाची असती तर भक्ती, हेमा व अंकिता या सीनियर डॉक्टर महिला पायलच्या वाटेला गेल्या नसत्या.
पायलच्या दुर्बलतेचा फायदा वरिष्ठांनी घेतला. सध्याच्या युगात संवेदनशील असून उपयोग नाही. जीवनात चढउतार हे असतातच. जीवनातील प्रत्येक क्षण हा संघर्षाचा, संकटांचा व आव्हानांचा असतो. त्यासाठी आपण कठोर असायला हवे. डॉक्टर होऊन आपल्या समाजात आपल्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करायचे पायलचे स्वप्न होते. तसेच सध्या जेलमध्ये असलेल्या भक्ती, हेमा व अंकिता या डॉक्टर तरुणींचे वैद्यकीय क्षेत्रात नाव कमवायचे स्वप्न होते. त्यांच्याही स्वप्नांचा चक्काचूर झाला. तेव्हा वरिष्ठांनीही आपल्या कामाच्या ठिकाणी कनिष्ठांशी कसे वागावे याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या हाताखालील सहकाऱयांवर अधिकार गाजविण्यापूर्वी, त्यांच्याशी फटकळपणे वागण्यापूर्वी त्यांचीही मानसिकता, बुद्धय़ांक (Intiligence quotient) समजून घेतला पाहिजे. कारण आज समाजात प्रचंड अस्थैर्य आहे. कौटुंबिक कलह, ताणतणाव, कर्जबाजारीपणा, न्यूनगंड आदी समस्या आहेत. अशा वेळी वरिष्ठांनी कनिष्ठांच्या समस्यांवर मीठ चोळू नये. नाहीतर तुमच्यावरही भक्ती, हेमा, अंकितासारख्या उच्चशिक्षित डॉक्टर तरुणींप्रमाणे जेलमध्ये जायची वेळ येईल. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आज भल्याभल्यांना जेलमध्ये जावे लागत आहे याचा सर्वच खडूस वरिष्ठांनी बोध घ्यावा. आपल्या सहकाऱयांशी, मुलाबाळांशी, पती-पत्नीशी सौजन्याने, प्रेमाने वागण्यातच या समाजाचे भले आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

























































