
>> प्रभाकर पवार
हिंदुस्थानचे गृहमंत्रीपद भूषविलेल्या काँग्रेसच्या पलनियप्पन चिदंबरम ऊर्फ पीसी या काँग्रेसच्या नेत्याला सीबीआयने गेल्या महिन्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक केली व त्यांची दिल्लीच्या तिहार जेलमध्ये रवानगी केली. चिदंबरम हे कायदेतज्ञ असून मद्रास व सुप्रीम कोर्टात त्यांच्या नावाचा आजही दबदबा आहे. तामीळनाडूच्या शिवगंगा जिल्हय़ातील कनाडूकथन येथे जन्मलेल्या चिदंबरम यांची येत्या 16 सप्टेंबर रोजी वयाची 74 वर्षे पूर्ण होणार होती. परंतु या बुद्धिमान नेत्यावर जेलमध्ये जायची वेळ आली. चिदंबरम हे सध्या राज्यसभेवर आहेत. चिदंबरम यांच्यापूर्वी त्यांचा खासदार मुलगा कार्ती यास सीबीआयने Money Laundering प्रकरणी अटक केली होती. तो अलीकडे बाहेर आला, परंतु बापाला आपल्या चिरंजीवाच्या कर्तृत्वामुळे आत जावे लागले. कपिल सिब्बल, अभिषेक संघवी आदी बडय़ा वकिलांची फौजही त्यांच्या कामाला आली नाही.
सध्या आपल्या पोरीच्या खून प्रकरणात जेलमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीच्या आयएनएक्स मीडिया या (तिच्याच मालकीच्या) बोगस कंपनीला 4 कोटी रुपये परदेशातून उभे करण्याची अनुमती असताना 300 कोटी रुपये उभे करण्याची अनुमती अर्थमंत्री असलेल्या चिदंबरम यांनी दिली. तेव्हाच चिदंबरम यांचा बाजार उठला होता. सरकार बदलले. काँग्रेसचे मागील लोकसभा निवडणुकीत व आताही पानीपत झाले. जे पेरले तेच उगवले. इशरत शेख चकमकप्रकरणी चिदंबरम यांनी ज्या पद्धतीने सीबीआयचा गैरवापर केला तेच बूमरँग त्यांच्यावर उलटले. आयुष्याच्या उतारवयात त्यांच्यावर जेलमध्ये जायची वेळ आली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वयाचा विचार करून त्यांची तिहार जेलमध्ये स्वतंत्रपणे खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांना Money Laundering प्रकरणीच जेलमध्ये जावे लागले होते. तशीच वेळ, तीदेखील माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर आली. ज्या मंत्र्यांनी गुंड, चोर, लफंग्यांना जेलमध्ये टाकले त्याच मंत्र्यांना त्यांच्याच सान्निध्यात जाऊन राहायची वेळ यावी याला काय म्हणावे? ‘कालाय तस्मै नमः’ चिदंबरम ज्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहेत त्या जेलमध्ये सुमारे 18 हजार कैदी आहेत. तिहार हा हिंदुस्थानातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठा तुरुंग आहे. तिहार जेलची क्षमता 6 हजार कैद्यांची आहे. परंतु त्या जेलमध्ये क्षमतेपेक्षा आज तीनपट कैदी आहेत. त्यामुळे कारागृह अधीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे फारच जोखमीचे असते. या जेलमध्ये सध्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आदी महत्त्वाचे कैदी असून याच जेलमध्ये 40 पेक्षाही अधिक गुन्हय़ांत सहभागी असलेला परदेशी नागरिक चार्लस् शोभराज 10 वर्षे होता. कारागृह सुरक्षारक्षकांना गुंगारा देऊन त्याने जेलमधून पलायन केले होते. पार्लमेंटवर हल्ला करणारा अफझल गुरूही तिहार जेलमध्ये एक दशकभर होता. उद्योगपती (सहाराचे मालक) सुब्रत रॉय यांचाही तिहारमध्येच गेली अनेक वर्षे मुक्काम आहे. त्यात आता या देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भर पडली आहे. छगन भुजबळ यांनी दोन वर्षे कारावास भोगला. आता चिदंबरम यांचे काय होते हे नियतीलाच माहीत.
स्पेक्ट्रम घोटाळय़ातील आरोपी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा, अण्णा द्रमुकच्या खासदार व माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या कन्या कनीमोझी, राष्ट्रकुल खेळ घोटाळय़ातील आरोपी खासदार सुरेश कलमाडी, उद्योगपती विनोद गोयंका, शाहीद बलवा, आसीफ बलवा आदी महत्त्वाच्या व्यक्तींनीही करोडो रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी तिहार जेलचा पाहुणचार घेतला आहे. अशा या बहुचर्चित जेलमध्ये आजही आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते. चोरून गुपचूप मोबाईल वापरले जातात. गांजा, चरस, विडी, सिगारेट यांची वाहतूक केली जाते. किरण बेदी या आयपीएस अधिकारी तिहार जेलच्या आयजी असताना त्यांनी जेलमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या होत्या. गांजा, चरस, विडी, दारूचा पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा मनी व मसल पॉवर असलेल्या आरोपींचे तेथे साम्राज्य सुरू झाले. त्यामुळे त्यांना तिहारमध्ये कोणतीही कमतरता भासणार नाही. परंतु चुकून अपराध घडलेल्या गरीब कैद्यांना मरणयातना भोगाव्या लागतात. त्यांना प्राथमिक वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत. बिचारे तडफडून तडफडून मरतात. डॉक्टर, कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांची युती असल्याने जेलबाहेरील रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी बडय़ा आरोपींनाच मिळते. छोटा राजन टोळीतील लखन भैया मुंबईत चकमकीत मारला गेल्यानंतर चकमकीत भाग घेणाऱ्या पोलिसांना जेलमध्ये जावे लागले. त्यातील मुंबईच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील सरवणकर नावाचा अधिकारीही होता. त्याला तळोजा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने व उपचार घेण्यासाठी वेळीच खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी न मिळाल्याने त्याचा आजार बळावला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. तेव्हा ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा गरीब कैद्यांसाठी जेल हे मृत्यूचे सापळे झाले आहेत, तर ‘व्हीआयपी’ आरोपींसाठी तिहारसारखे जेल स्टार हॉटेल आहेत. व्हीआयपी आरोपींच्या छातीत दुखले तरी पंचतारांकित रुग्णालयात हलविले जाते आणि चुकून कुणी राजन पिल्लईसारखा बिस्कीट किंग (राजन पिल्लई तिहार जेलमध्ये असताना त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला) दगावला तर त्याची उच्चस्तरीय चौकशी होते. सांगायचे तात्पर्य इतकेच की, जेलमध्ये गरीबांना वाली कुणी नाही.






























































