
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनिल वसंतराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत. सत्तरीच्या उंबरठय़ावर असलेले अनिल देशमुख हे नागपूरचे असून एमएस्सी शिकलेल्या या मंत्र्याने यापूर्वी म्हणजे 1995 ते 2004 सालापर्यंत शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, माहिती व जनसंपर्क, उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आदी राज्य व कॅबिनेट मंत्रीपदे भूषविली आहेत. गृहमंत्रीपद सांभाळण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. अनिल देशमुख यांनी याआधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह 1995 ते 1999 या काळात शिवसेना-भाजप युती सरकारमध्येही मंत्रीपद भूषवले होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबईनंतर सर्वाधिक चर्चा असलेल्या नागपूर जिल्हय़ात ते राहतात. त्यामुळे अनिल देशमुख गृहमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळतील अशी अपेक्षा त्यांचे हितचिंतक करीत आहेत. गृहमंत्रीपद हे सर्वात जोखमीचे मंत्रीपद समजले जाते. ते स्वीकारण्यासाठी सहसा कुणी तयार होत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर गृहमंत्र्यालाच जबाबदार धरले जाते. प्रसंगी राजीनामा द्यायची वेळ येते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला त्या वेळी गृहमंत्री असलेल्या रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर. आर. पाटील यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता तसा काही हल्ला होणार नाही. कारण आता आपल्या सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा पूर्वीपेक्षा फारच सक्षम आहेत. पुन्हा मुंबईवर हल्ला करण्याची हिंमत आता पाकिस्तान करणार नाही असे पोलीस सांगतात. असो. परंतु आर. आर. आबा यांचे महाराष्ट्र पोलिसांसाठी फारच मोठे योगदान आहे. त्यांनी राज्य पोलीस दलातील कारभारात पारदर्शकता येण्यासाठी बरेच प्रयत्न केले. बदल्या करताना मराठी अधिकाऱयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. या भूमीशी, मातीशी नाळ जोडलेल्या मराठी व अमराठी अधिकाऱयांच्याही जास्तीत जास्त नेमणुका केल्या. आर. आर. पाटलांनंतर गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या जयंत पाटील यांनीही मराठी अधिकाऱयांना न्याय दिला, परंतु त्यानंतर मुंबईतून मराठी अधिकारी बाहेर फेकले गेले. आता अनिल देशमुख हा बॅकलॉग भरून काढतील असे त्यांचे सहकारी सांगतात.
आर. आर. पाटील यांनी मुंबईतील 2005 साली डान्सबारला टाळे ठोकून तमाम महिलांची सहानुभूती मिळवली. पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य योजना सुरू करून आर. आर. यांनी पोलिसांना प्रचंड दिलासा दिला. आबांमुळे आज पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना लीलावतीसारख्या तारांकित रुग्णालयातही मोफत उपचार मिळतात. पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या उपचाराचे बिल स्वतः राज्य सरकार रुग्णालयांना ‘पेड’ करते. त्यामुळे आबांसारख्या प्रामाणिक गृहमंत्र्याला कुणीही विसरणार नाही. तेव्हा आबांची अपुरी राहिलेली पोलीस दलातील कामे अनिल देशमुख पुढे नेतील, मार्गी लावतील असे वाटते. 30 ते 35 वर्षे पोलीस सेवा केल्यानंतर आमचा पोलीस रिटायर होतो, त्यानंतर त्याला सरकारी घर सोडावे लागते. काहींची खासगी घरे असतात. ते आपल्या खासगी घरी किंवा गावाला जाऊन स्थिरावतात. परंतु काही पोलिसांकडे सेवानिवृत्त झाल्यानंतरही निवारा नसतो. आजही महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाख पोलिसांपैकी 60 टक्के पोलिसांना सरकारी घरे देण्यात आलेली नाहीत. हे चित्र आता बदलण्याची गरज आहे. परप्रांतातून मुंबईत आलेल्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहिलेल्यांना सरकार पक्की घरे देते; मग आमच्या पोलिसांना हाऊसिंग सोसायटय़ांसाठी का भूखंड दिले जात नाहीत, त्यांनी काय पाप केले आहे? पोलिसांना का नाही त्यांच्या हक्काची घरे मिळत? पोलिसांना त्यांच्या मालकीची घरे व रिटायर झाल्यानंतर ज्या वैद्यकीय सेवा लीलावतीसारख्या खासगी रुग्णालयात मिळतात त्या सेवा सुरू ठेवल्यास हे सरकार नक्कीच लोकाभिमुख होईल. अनुभवी अनिल देशमुख यांनी पुढाकार घेतल्यास काहीच कठीण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांसाठी जे जे चांगले करता येईल याची प्रत्येक कार्यक्रमात ग्वाही दिलीच आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात बदल्या व बढत्यांचा कायम घोळ असतो. त्या कधीच वेळेवर होत नाहीत. त्यामुळे त्यात पारदर्शकता राहत नाही. रिकाम्या जागा व पदे भरली जात नाहीत. आजही पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा पोलीस दलात प्रचंड तुटवडा आहे. त्याचा तपासावर परिणाम होत आहे. गुन्हेगार मोकाट सुटत आहेत. त्यांना शिक्षा होत नाही. आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण 30 टक्केही नाही. CONVICTION RATE वाढल्यास गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल. आज गँगवॉर संपले आहे. अंडरवर्ल्ड नियंत्रणात आहे. फक्त कुणी पुजारी नावाचा किडा सतत परदेशातून वळवळत असतो. मुंबई-ठाण्यातील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत असतो. त्याचा आता कठोरपणे बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. सायबर क्राइमनेही उच्चांक गाठला आहे. यावर नियंत्रण आणणे फारच गरजेचे आहे. वातानुकूलित केबिनमध्ये काम करणाऱया सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांचा विचार केला तर आमचा पोलीस दिवसरात्र राबत असतो. उन्हापावसाचा विचार न करता रस्त्यावर उभा राहून बंदोबस्त करीत असतो, परंतु आज त्याला हव्या तशा प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. महिला पोलिसांची अवस्था तर दयनीय आहे. बऱयाच पोलीस ठाण्यांत शौचालयाचीही सोय नसते. आजही काही पोलीस ठाणी भाडय़ाच्या जागेत आहेत. पोलिसांना आज चौक्याही नाहीत. असल्या तर त्या अनधिकृत व मनुष्यबळ नसल्यामुळे बंद असतात. बरीच वाहने तर बाबा आदम जमान्यातील आहेत. मध्य प्रदेशात पोलीस वाहनांचे खासगीकरण करण्यात आले आहे. घ्हहदन्a सारख्या खासगी गाडय़ा मध्य प्रदेश पोलीस वापरतात. वाहनांचे मेंटेनन्स खासगी कंपन्या करतात. महाराष्ट्रात मध्य प्रदेश पॅटर्न राबवल्यास महाराष्ट्र पोलिसांची झदिस्aहम क्षमता नक्कीच वाढेल. गुन्हेगारांना चाप बसेल. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत गृह राज्यमंत्री सतेज पाटील (शहर), शंभुराजे देसाई (ग्रामीण) हे मंत्री आहेतच. त्यात यापूर्वी सतेज पाटील यांनी गृह राज्यमंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली असून हे तिन्ही मंत्री पोलिसांना न्याय देतील. आर. आर. आबांची अपुरी कामे पूर्ण करतील अशी अपेक्षा करूया.
























































