
मध्यरात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या स्पिकरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला टोळक्याने धक्काबुक्की केल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री खडकीतील मूळा रोड परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.
सुमीत सुभाष मिश्रा (वय 20), रसल एल्वीस जॉर्ज (वय 27), ऋषभ अशोक पिल्ले , निशांत संजय गायकवाड (वय 23), सिद्धार्थ महादेव लोहान (वय 24, सर्व रा. मुळा रस्ता, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांनी फिर्याद दिली आहे. मुळा रस्त्यावरील त्यागी बंगला परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी मोठ्या स्पिकरवर गाणी लावून आरोपी नाचत होते. स्पिकरवर कुठली गाणी वाजवायची यावरून आरोपींमध्येच वाद सुरू झाला.
त्यावेळी हा वाद पाहून गस्त घालणारे उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, सहकारी पोलीस कर्मचारी जाधव तेथे गेले. त्यांनी स्पिकर बंद करा, असे सांगून कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपींनी अरेरावी सुरू केली. आम्ही कोण आहोत, याची माहिती तुम्हाला नाही. पोलीस आम्हाला काही करु शकणार नाही, असे सांगून आरोपींनी उपनिरीक्षक बेंदगुडे आणि जाधव यांना धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर पोलिसांच्या वाहनाची चावी काढून घेतली. शासकीय कामात अडथळा आणणे तसेच धक्काबु्क्की केल्या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम पुढील तपास करत आहेत.























































