
सामना प्रतिनिधी, मुंबई
अन्य कुठल्याही प्रवाशास परवानगी नसलेल्या लोकलच्या अपंगांच्या डब्यात स्वतः पोलीसच घुसखोरी करीत आहेत. अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱया घुसखोरांविरोधात मध्य रेल्वेने केलेल्या विशेष कारवाईत पोलीसच त्या डब्यातून प्रवास करताना रंगेहाथ सापडले. याबाबत रेल्वेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून हा लाजिरवाणा प्रकार आहे. असे पुन्हा होऊ नये असा कर्मचाऱयांना समज देण्याबाबत सांगितले आहे.
अपंग, आजारी रुग्ण किंवा गर्भवती महिलांसाठी लोकलमध्ये एक डबा आरक्षित असतो. त्यांच्याव्यतिरिक्त त्या डब्यातून दुसऱया कोणालाही प्रवास करण्याची परवानगी नाही. विशेष म्हणजे अपंगांच्या डब्यातून दुसर कोणी प्रवास करू नये यासाठी रेल्वे पोलीस फलाटावर फिल्डिंग लावून असतात. पण मध्य रेल्वेने गेल्या दोन दिवसांत घेतलेल्या विशेष मोहिमेत चक्क पोलीसच अपंगांच्या डब्यात घुसखोरी करून प्रवास करताना रंगेहाथ सापडले. या विशेष मोहिमेत एकूण 766 घुसखोर प्रवासी सापडले. त्यात पोलिसांव्यतिरिक्त नामांकित कंपन्या आणि बँकेत काम करणाऱयांचादेखील समावेश आहे. ते प्रवासी ज्या ठिकाणी कामाला आहेत त्या कंपनीच्या वरिष्ठांना, पोलीस आयुक्तांना रेल्वे सुरक्षा बलाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. ही लाजिरवाणी बाब आहे. असे पुन्हा होता कामा नये याकरिता तुमच्या कर्मचाऱयांना समज द्या, असे त्या पत्रातून सांगितले आहे. थेट वरिष्ठांनाच पत्र लिहिल्यामुळे पुन्हा असे प्रकार होताना दिसणार नाही अशी आशा मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ता सुनील उदासी यांनी व्यक्त केली आहे.
जरब बसावी म्हणून वरिष्ठांना पत्र
लोकलच्या विशेष डब्यातून दुसरे कोणीही प्रवास करू नये असे बंधनकारक असतानाही काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. बेकायदेशीर प्रवास केल्यास आपल्यावर वरिष्ठांकडून कारवाई होईल अशी भीती घुसखोर प्रवाशांमध्ये निर्माण व्हावी, त्यांना जरब बसावी म्हणून थेट त्यांच्या वरिष्ठांनाच पत्र लिहिले जात असल्याचे सुनील उदासी यांनी सांगितले.
22 लाखांची दंडवसुली
जानेवारी ते जुलै यादरम्यान मध्य रेल्वेने अशा घुसखोरांविरोधात वेळोवेळी धडक मोहीम राबवली. या कालावधीत जवळपास 9 हजार 173 घुसखोर रंगेहाथ आमच्या हाती लागले. त्यांच्याकडून 22 लाख 26 हजार रुपये दंडवसुली केली.



























































