खाकीच्या लाठय़ा ‘प्राणघातक’, पोलिसांचा ‘प्रसाद’ जिवावर बेतू शकतो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

संशयित आरोपीला बोलते करण्यासाठी वा कुणाला ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीने दिला जाणारा ‘प्रसाद’ सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यात सापडला आहे. पोलिसांच्या हातातील लाठय़ा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. या लाठय़ा एक प्रकारची ‘मृत्यूची हत्यारे’ बनू शकतात, असे महत्त्वपूर्ण मत न्यायालयाने नोंदवले आहे.

पोलिस लाठय़ांचा वापर कशा पद्धतीने करतात, यावर बरेच काही अवलंबून आहे, असे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने नमूद केले. 36 वर्षांपूर्वी ओडिशात एका आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. दोघा पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रभर केलेल्या बेदम मारहाणीत त्याला प्राण गमवावा लागला होता. या प्रकरणात शिक्षा सुनावली गेल्यानंतर दोषी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यांच्या अपिलावर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिस दलातील लाठीच्या वापरावर चिंता व्यक्त केली. मृत्यू झालेल्या तरुणाच्या पुटुंबियांनी प्रकरण मिटवण्यास तयारी दाखवली. मात्र न्यायालयाने अशा प्रकारच्या समझोत्याला नकार दिला. न्यायालयाने दोन्ही पोलिसांची शिक्षा सहा महिन्यांनी कमी केली व मृत्यू झालेल्या तरुणाच्या पुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या भरपाईत वाढ केली.

न्यायालय काय म्हणाले?

पोलिस हे कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक आहेत. नागरिक आपले जीवन व घराच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडेच आशेने बघतात. आपल्यावरील अन्याय दूर होऊन दोषीला शिक्षा व्हावी, यासाठी नागरिक पोलिस ठाण्याची पायरी चढतात. मात्र जनता व समाजाचा रक्षकच जर रक्षण करण्याऐवजी पोलिस ठाण्यात आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण करणार असतील तर हा गंभीर चिंतेचा विषय आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने निकालपत्रात नोंदवली आहे.