
सामना प्रतिनिधी । परभणी
शिवप्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 10 ते 12 वर्षापासून नवरात्र महोत्सवाअंतर्गत सुरु असलेल्या दुर्गामाता दौडला खिळ घालण्याचा प्रयत्न नानलपेठ पोलिसांनी केला होता. परंतु शिवसेनेच्या खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांना नमते घ्यावे लागले. पोलिसांनी दंडेलशाहीने ताब्यात घेतलेला शंकर देशमुख या कार्यकर्त्याला सोडून द्यावे लागले. तसेच यापुढे दुर्गामाता दौडला कोणतीही हरकत होणार नाही, असेही नानलपेठ पोलिसांनी स्पष्ट केले.
सोमवारी सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान सुरु असलेल्या दुर्गामाता दौडला काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली होती. त्यानंतर दौडमध्ये ध्वजहाती घेतलेल्या धारकरी शंकर देशमुख या कार्यकर्त्याला नानलपेठ पोलिसांनी बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्याशी आरेरावी आणि दंडेलशाही करत या कर्मचाऱ्यांना दोन तास बसवून ठेवले. दौडमध्ये ‘जय भवानी जय शिवाजी’या घोषणा देण्यासही पोलिसांनी आक्षेप घेतला. तसेच या दौडला कोणी परवानगी दिली? असा सावालही पोलिसांनी केला. त्यानंतर दोन तासांनी शंकर देशमुख यांच्या हाताचे ठसे घेऊन तसेच कोणत्याही आक्षेपार्ह वर्तन करणार नाही, असे लेखी घेऊन त्याला सोडून दिले.

सदरील बाब शिवसेना खासदार संजय जाधव यांना समजताच त्यांनी तातडीने नानलपेठ पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलिसांना खडेबोल सुनावले. तसेच शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनीही पोलीस ठाण्यास भेट देऊन शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना का रोखता? असा खडा सवाल केला. तसेच या पुढे या दुर्गामाता दौडला कोणत्याही प्रकारचा पोलिसांनी आक्षेप घेऊ नये, घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही दिला. त्यामुळे नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी सदरील दुर्गामाता दौडला यापुढे कोणीही रोखणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे गेल्या 10 ते 12 वर्षापासून सुरू असलेल्या पारंपारिक दुर्गामाता दौड नेहमीप्रमाणे दररोज सकाळी 6 ते 7 पर्यंत शहरातील विविध भागात चालू राहणार असल्याचे शिवप्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

या दौडमधील ध्वजधारी धारकऱ्यांचे ठिक-ठिकाणी सुवासीनी महिलांकडून औक्षण केले जाते. 150 ते 200 युवक या दौडमध्ये सहभागी असतात. शहरातील नऊ भागात नऊ रात्रीचे नऊ दिवस ही दौड आयोजित करण्यात येते. भगवेपेâटे, टोप्या यामुळे वातावरण भगवेमय झाल्यामुळे काही समाजकंटकाचे पोटसूळ उठल्यामुळे बहुदा पोलिसांनी ही कारवाई केली असावी, अशी चर्चा युवकांमध्ये दिसून आली. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना उपशहरप्रमुख तुषार चोभारकर, संदीप पांगरकर, मकरंद कुलकर्णी व अन्य शिवसैनिकही सहभागी झाले होते.

























































