अलिबागमध्ये बोगस नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, 12 लाख रुपये किमतीच्या नोटा जप्त

प्रातिनिधीक फोटो

गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह तीन जणांना अटक केल्याचा प्रकार ताजा असतानाच अलिबाग शहरात बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट पोलिसांपी उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी भूषण पतंगे याला अटक केली असून त्याच्याकडून 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा छपाई करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. हा बोगस नोटांचा कारखाना गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. रायगड जिल्ह्यात बोगस नोटांचा सुळसुळाट झाल्यामुळे पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे.

अलिबाग शहरातील मध्यवर्ती भागात मयेकर वाडीत एका व्यक्तीकडे बनावट नोटा असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली. अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे शुक्रवारी रात्री आपल्या पथकासह तेथे पोहोचले. माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. यामध्ये 500 रुपये, 200 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. याशिवाय नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा कलर प्रिंटर, नोटा कापण्यासाठीचा कटर जप्त केला आहे. आरोपीने या नोटा कुठे कुठे चलनात आणल्या, त्याचे आणखी कुणी साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत

आरोपी भूषण पतंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाल याने दिले आहेत. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.