आरोपीला पकडायला पोलीस पोहोचले चड्डी-बनियनमध्ये! वाचा काय झालं नेमकं….??

आपल्या अखत्यारितल्या प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं काम पोलीस करतात. त्यासाठी त्यांना प्रचंड शारीरिक, मानसिक ताकद खर्च करावी लागते. कधी कधी एखादा आरोपी सवाई ठरण्याची वेळ येते, तेव्हा मात्र पोलीस शक्कल लढवतात आणि त्यांना पकडतात. असाच काहीसा प्रकार बिहार येथे झाला आहे.

बिहार येथे आरोपींच्या शोधार्थ भटकणाऱ्या पोलिसांवर धाड टाकताना चक्क अंतर्वस्त्रांवर जायची वेळ आली. त्याचं झालं असं की बिहारमध्ये अवैध दारूविक्रीचा व्यवसाय तळागाळापर्यंत रुजला आहे. या व्यवसायाला संपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही पोलिसांना म्हणावं तितकं यश आलेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या दारू भट्ट्यांवर बिहार पोलीस धाड टाकण्यासाठी अजिबात टंगळमंगळ करत नाहीत.

हे प्रकरण बिहार येथील तारेगना टोक येथे घडलं. पोलिसांनी इथल्या अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. येथून वाहणाऱ्या सोन नदीच्या तटावरही अशा अनेक भट्ट्या आहेत. काही दिवसांपूर्वी या नदीच्या किनाऱ्यावर एक भट्टी चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही भट्टी जिथे होती, तिथे चारही बाजूंनी पाणी होतं. तरीही पुरेशी साधन सामुग्री न घेताच पोलीस तडक ती भट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी पोहोचले. नदीवर होडी नव्हती आणि पोलिसांनीही तशी कोणतीच तरतूद केली नव्हती. अखेर त्यांनी पोहून जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून त्यांनी अंगावरची वर्दी उतरवली आणि ते नदीत उतरले.

bihar-police-under01

ते पोहून दुसऱ्या काठावर पोहोचेपर्यंत भट्टीच्या मालकापर्यंत पोलिसांची खबर पोहोचली होती. त्याच्यासह त्याच्या साथीदारांनी तिथून पोबारा केला. पण, याची कल्पना नसलेल्या बिहार पोलिसांनी पाण्याबाहेर येताच पुन्हा वर्दी चढवण्यासाठी वेळ फुकट घालवला नाही. ते तसेच अंतर्वस्त्रांसह थेट भट्टीवर पोहोचले. पण, आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी मग ती भट्टी उद्ध्वस्त केली. या घटनेबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर बिहार पोलिसांना पुरेशी साधनसामुग्री देण्याची मागणी केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या