पोलिस वसाहतीची दुरवस्था, गवत, झाडा झुडपांचे जंगल वाढले

543

स्वतःची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसांचे 24-24 तास काम करणाऱ्या पोलिसांची सुरक्षाच धोक्यात आल्याचे उरण पोलीस वसाहतीत पाहायला मिळते. या पोलीस वसाहतीला समस्यांनी ग्रासले आहे. पोलीस कॉलनीला गवत, झाडा झुडपांनी वेढले असून मोकळ्या जागेत गवताचे जंगल झाले आहे. या जंगलामुळे इथे साप, विंचू तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला असून त्यामुळे इथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटूंबीयांचा जीव धोक्यात आला आहे.

 उरण नगरपरिषद हद्दीत नागाव- म्हातवली गावाजवळ ही पोलीस वसाहत असून या वसाहतीत कर्मचाऱ्यांसाठी तीन इमारती आणि अधिकाऱ्यांसाठी एक इमारत आहे. 2006 साली ही वसाहत बांधण्यात आली. मात्र या वसाहतीत असणाऱ्या असुविधामुळे या इमारतीमध्ये पोलीस कर्मचारी राहण्यास उत्सुक नसतात. तरी देखील सध्या या वसाहतीत उरण पोलीस ठाण्यातील आणि मोरा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून 25 ते 30 कुटुंब इथे राहतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून या इमारतींच्या आवारातील गवत काढले गेले नसल्यामुळे या वसाहतीला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या गवतात असणाऱ्या साप आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे पालक मुलांना बाहेर पाठवण्यास घाबरू लागले आहेत. गेल्या कित्येक वर्षात इमारतीच्या पाण्याची टाकी साफ केली गेली नसल्यामुळे इथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दुषित पाणी प्यावे लागते. त्याच प्रमाणे वसाहत बांधल्या पासून या वसाहतीच्या शौचालयाच्या टाक्या साफ केल्या गेल्या नसल्यामुळे या शौचालयाच्या टाक्या पूर्ण भरल्या असून काही शौचालयं तुंबली आहेत आणि याची दुर्गंधी येथे पसरली आहे. शौचालयाच्या टाक्यांमधले पाणी इमारतींच्या भोवताली रस्त्यांवरून वाहत असते.

दिवसभर काम करून थकून भागून आलेल्या पोलिसांना घरी आल्यानंतर विश्रांतीची गरज असते. मात्र इथल्या, वसाहतीतल्या समस्या बघून त्यांना इथे राहणे नकोसे झाले आहे. वरिष्ठ अधिकारी देखिल पोलिसांच्या या समस्येकडे लक्ष देत नसल्यामुळे दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न इथे राहणाऱ्या पोलिसांना पडला आहे. अगोदरच तुटपुंजा पगार, त्यात या वसाहतीत राहण्याचे भाडे शिपायाला 6 हजार 500 रूपये, हवालदार 9 ते 10 हजार रूपये शिवाय दर महिन्याचा देखभाल दुरूस्तीसाठी ठराविक रक्कम नियमित पगारातून कापले जातात असे असताना देखील या बाबत वाच्यता करण्यास इथे राहणारे पोलीस घाबरतात. वरिष्ठांच्या रोषाला कारण नको म्हणून इथे राहणारे पोलीस तोंड बंद करून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर आपल्याला कुठेतरी अडगळीत ड्युटी वर पाठवतील या भीतीने नाव न छापण्याच्या अटीवर इथल्या काही पोलिसांनी पत्रकारांना त्यांच्या वसाहतीतील समस्या सांगितल्या. वर्तमान पत्रात बातमी आल्यानंतर तरी वरिष्ठ अधिकारी या वसाहतीची दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत होती.

आपली प्रतिक्रिया द्या