संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा – मुख्यमंत्री

509

पोलीसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असले पाहिजे. गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्याच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिला. दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी आणखी कठोर तयारी करावी, असेही ते यावेळी म्हणाले. पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री ठाकरे मार्गदर्शन करत होते.

महाराष्ट्र सुरक्षित ठेवणारे शूरवीर असा पोलीस दलाबद्दल गौरवोल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, कोणतीही नवीन योजना प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या भरवशावर आणली जाते. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस दलाचे महत्त्वपूर्ण योगदान असते.

ठाकरे म्हणाले की, आज गुन्ह्यांच्या स्वरुपात आणि गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला आहे. पोलीस दलामध्ये ज्याप्रमाणे उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगार, नक्षलवादीदेखील सुशिक्षत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करुन तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करत राहिले पाहिजे. सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीसी प्रशिक्षण बंधनकारक आहे. तर दुसरीकडे दहशतवादी कारवायांसाठी मुलांना वयाच्या 6- 7 व्या वर्षांपासून प्रशिक्षित केले जाते. हे देखील समोर आले आहे. त्यामुळे अशा आव्हानांचा आपल्याला सामना करायचा असेल तर यासंबंधीचे शिक्षण शालेय पातळीपासूनच द्यावे लागेल.

पोलीसांनी निःस्वार्थी, निःस्पृहपणे काम करुन त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुन्ह्यामध्ये वेगवान तपास करुन आश्वासक कामगिरी केली पाहिजे. राज्य पोलीस दलाला आवश्यक सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅब, आधुनिक तपास सामग्री दिली जाईल; पोलीसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या