बाळापुरची हॉटसीट एपीआयला; दुय्यम ठाण्यात पीआय, एसपींनी काढला बदल्यांचा फतवा

542

जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा फतवा जारी केला असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बदली झालेल्या आखाडा बाळापुर व औंढ्याच्या पोलीस निरीक्षकाला कार्यमुक्त केले आहे. दरम्यान, 83 गावांचा कारभार पाहणाऱ्या आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याच्या हॉटसीटवर रवी हुंडेकर एपीआयची वर्णी एसपींनी लावली आहे तर पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना औंढा नागनाथ ठाण्यात प्रभारी म्हणुन पाठविले आहे. गोरेगावसारख्या 48 ठाण्यांचा कारभार असलेल्या दुय्यम ठिकाणी पोलीस निरीक्षक कार्यरत असुनही आखाडा बाळापुरसारख्या महत्वाच्या पोलीस ठाण्यात एपीआयला प्रभारी करुन पोलीस अधीक्षकांनी मोठा विश्वास दाखविला आहे.

आखाडा बाळापुरचे गणपत राहिरे व औंढ्याचे कुंदन वाघमारे या दोन पोलीस निरीक्षकांची जिल्ह्यातील तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने परभणी जिल्ह्यात बदली केली होती. गणेशोत्सव पार पडल्यावर पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी या दोघांनाही कार्यमुक्त करण्याचे आदेश बजावले आहेत. तसेच जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या केल्या आहेत. वाघमारे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या औंढा नागनाथला पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांची विनंतीवरुन बदली झाली आहे. आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात एपीआय रवी हुंडेकर यांची तर नर्सी नामदेव ठाण्यात एपीआय सुनील गोपनवार, बासंबा पोलीस ठाण्यात एपीआय राजेश मलपिल्लु यांची नियुक्ती पोलीस अधीक्षकांनी केली आहे. यासोबतच हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अविनाश खंदारे, औंढ्याला गजानन मोरे, हिंगोलीच्या नियंत्रण कक्षा दिक्षा लोकडे, वसमत शहरला पंढरीनाथ बोधनापोड व श्रीदेवी पाटील, पोलीस अधीक्षकांचे वाचक म्हणुन विलास चवळी या सहायक पोलीस निरीक्षकांना एसपींनी पाठविले आहे. तसेच गोरेगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप धडवे यांना हट्टा येथे तर हट्ट्याचे पीएसआय ज्ञानोबा मुलगीर यांना कळमनुरीला आणि पीएसआय ज्ञानेश्वर शिंदे यांना कसुरी अहवालावरुन गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांनी पाठविले आहे. जिल्ह्यांतर्गत प्रशासकीय व विनंती बदलीचे अधिकार पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाला आहेत. दरम्यान, गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे हे प्रभारी अधिकारी आहेत. गोरेगाव हे आखाडा बाळापुरच्या तुलनेत दुय्यम पोलीस ठाणे मानले जाते. मात्र, गोरेगावला पीआय कायम ठेवतांना आखाडा बाळापुर येथे एपीआयला प्रभारी अधिकारी करुन पोलीस अधीक्षकांनी चांगलाच धाडसी निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या