संभाव्य तिसऱ्य़ा लाटेआधी पोलिसांचे लसीकरण पूर्ण करा, विशेष पोलीस महानिरीक्षक अस्वथी दोरजे यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सरकारपातळीवर सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने खबरदारी घेऊन लसीकरण न झालेल्या पोलीस कर्मचाऱ्य़ांचे लसीकरण तत्काळ पूर्ण करून घेण्याचे निर्देश नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अस्वथी दोरजे यांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित असून, त्यांचा तपास पूर्ण करण्यासह फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अस्वथी दोरजे यांनी सोमवारी नगर जिल्ह्यातील पोलीस दलाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते.

महानिरीक्षक अस्वथी दोरजे म्हणाल्या, नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून तत्काळ उपाययोजना करा. स्थानिक पातळीवर शक्य ती मदत करा. पोलीस दलामधील लसीकरण पूर्ण करा. कोरोनातून बऱ्य़ा झालेल्या कर्मचाऱ्य़ांची विशेष काळजी घ्यावी, त्यांच्या उपचारपद्धतीची माहिती सातत्याने घ्यावी. यासह जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांचा तपास तत्काळ पूर्ण करून फरार आरोपींना अटक करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी नव्याने बिट मार्शल कार्यान्वित करण्याच्या सूचनाही दोरजे यांनी दिल्या.

रुग्णालयांमधील नातेवाइकांची गर्दी कमी करा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीतील नुकसान टाळण्यासाठी नियोजन करा. पावसाळ्यात जिल्ह्यातील अथवा गावांतील महत्त्वाचे रस्ते बंद होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांत रुग्णांचे नातेवाईक येत असल्याने तेथे मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही दोरजे यांनी दिल्या आहेत.