आदेश निघाला तरी स्टार खांद्यावर लागेना;पोलीस आयुक्तांच्या नोटिसीकडे अंमलदारांचे डोळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2013 मध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तब्बल 160 अंमलदारांना उपनिरीक्षकपदी बढतीचा आदेश महासंचालक कार्यालयाकडून दोन आठवडय़ांपूर्वी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईबाहेरील 90 अंमलदार फौजदार म्हणून कामही करू लागले. परंतु अद्यापपर्यंत मुंबई आयुक्तांची नोटीस न आल्याने मुंबईतील 70 हून अधिक अंमलदारांना फौजदार म्हणून काम करणे अशक्य झाले आहे. परिणामी नोटीस कधी येते आणि दोन स्टार आपल्या खांद्यावर कधी लागतात याकडे त्या अंमलदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

2013 मध्ये विभागीय परीक्षेत अनेक अंमलदार उत्तीर्ण झाले होते. त्यांना आता उपनिरीक्षकपदी बढती देण्यात येत आहे. 8 मार्च रोजी राज्यातील 160 अंमलदारांना उपनिरीक्षकपदी बढतीचा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आला. त्यामुळे उपनिरीक्षक व्हायचे या अंमलदारांचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबई वगळता अन्य ठिकाणी कार्यरत असलेल्या अंमलदारांची तेथे नोटीस झाल्याने ते उपनिरीक्षक म्हणून काम देखील करू लागले. परंतु मुंबई आयुक्तालयातील 70 हून अधिक अंमलदारांची नोटीस न झाल्याने ते अजूनही अंमलदार म्हणूनच काम करीत आहेत. नवीन ड्रेस शिवलाय आणि फौजदार म्हणून काम करायचे यासाठी ते अंमलदार तयार झाले आहेत. पण नोटीस होत नसल्याने प्रत्येक दिवस हे अंमलदार आज तरी नोटीस होईल या आशेवर आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे याची दखल घेऊन लवकर नोटीस काढतील आणि आम्ही फौजदार म्हणून काम करू, असे म्हणत प्रत्येक दिवस अंमलदार ढकलत आहेत.

आज माहिती मागवली

मुंबई शहर दाखविलेले जवळपास 70 हून अधिक अंमलदार दोन स्टार खांद्यावर कधी मिळणार याकडे लक्ष लागून असतानाच त्यांच्याकडे आज पोलीस आयुक्तांच्या प्रशासन विभागाकडून तीन पसंतीची ठिकाणे सांगण्याबाबत विनंतीअर्ज करण्यास त्या अंमलदारांना सांगण्यात आले आहे.