
होलिकोत्सव साजरा करताना लाकडांचा वापर केला जातो. त्यासाठी सार्वजनिक, खासगी परिसरातील झाडे अथवा झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. हे कृत्य पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याने त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. जो कोणी झाडे अथवा झाडाच्या फांद्या तोडताना सापडेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
धुलिवंदन व होळी शहरात मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. मात्र होळी साजरी करणाऱयांकडून रस्त्यांच्या आजूबाजूची व खासगी आवारातील अनेक झाडे होळीमध्ये जाळण्यासाठी तोडली जातात. केवळ उनाड मुलेच नाही तर चांगल्या ठिकाणी राहणारी, सुशिक्षित मुले व माणसेही झाडे तोडण्याचे कृत्य करतात. पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांची कत्तल होणे अत्यंत गंभीर बाब आहे. शिवाय महाराष्ट्र (शहर विभाग) झाडे संरक्षण कायदा, 1951 प्रमाणे झाडे तोडणे हा गुन्हा आहे. महाराष्ट्र (शहर विभाग) झाडे संरक्षण कायदा 1975 (दि. 01/03 /2001पर्यंत सुधारित) प्रमाणे झाडे तोडण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या ट्रीज ऍथोरिटीजची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना बेकायदेशीर झाडे तोडल्यास उपरोक्त कायद्याच्या कलम 21 प्रमाणे कमीत कमी रुपये एक हजार व जास्तीत जास्त रुपये पाच हजार एवढी दंडाची शिक्षा असून कमीत कमी एक आठवडय़ाच्या कारावासाची शिक्षासुद्धा होऊ शकते. होळी साजरी करणाऱयांकडून झाडावर कुऱहाड चालविली जाणार नाही. विशेषतः पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर रस्त्यांच्या बाजूला, जेथे अनेक खासगी व सार्वजनिक संस्थांनी पुष्कळ झाडे लावलेली आहेत, तेथे पोलीस गस्त ठेवावी, अशा वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
रासायनिक रंग विकणारेही रडारवर
रंगपंचमीला बेकायदेशीरपणे रासायनिक रंगांची विक्री मोठय़ा प्रमाणात केली जाते. या घातक रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे अथवा मानवी शरीरावर मोठी इजा होऊ शकते. तरी या होळी – रंगपंचमी सणांच्या पार्श्वभूमीवर घातक रासायनिक रंग विकताना कोणी सापडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


























































