
सामना प्रतिनिधी, मुंबई
हरवलेल्या व बेवारसपणे शहरात फिरणाऱ्या मुले व मोठय़ा व्यक्तींची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. भीक मागणारी किंवा बालमजुरी करणारी अनेक मुले घरातून पळून आलेली असतात किंवा त्यांना फूस लावून आणले जाते. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू करण्यात आले असून शहरातील काही ठिकाणांना रडारवर आणले आहे.
रस्त्यावर, लोकलमध्ये, मंदिर परिसरात, गर्दीच्या ठिकाणी लहान मुले भीक मागताना सर्रास दिसतात. तसेच कारखाने, पानटपरी, हॉटेल, चहा स्टॉलवर मजुरी करताना लहान मुले सापडतात. या लहान मुलांकडून जबरदस्ती ही कामे करून घेतली जातात. त्यांना फूस लावून शहरात आणले जाते किंवा गरीब घरातील मुलांना पळवून हे काम करण्यास भाग पाडले जाते. अशा जवळपास 247 बालकांची पोलिसांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’दरम्यान या दलदलीतून सुटका केली होती.
त्यात भीक मागणाऱ्या 46 बालकांचा समावेश होता. ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागला त्यांची घरवापसी केली. परंतु ज्यांचे कोणीच मिळून आले नाही त्यांना बालगृहात ठेवण्यात आले. गेल्या वेळेस केलेल्या कारवाई वेळी शहरात कुठल्या ठिकाणी भीक मागताना मुले सापडतात तसेच कुठल्या ठिकाणी कारखान्यांमध्ये मुलांना मजुरीसाठी जुंपले जाते, ती ठिकाणे पोलिसांनी आपल्या रडारवर आणली आहेत. आता त्या ठिकाणी वॉच ठेवून कारवाई करण्यात येईल.
दररोज मुले तसेच मोठी माणसे हरवल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. त्यामुळे हरवलेल्या मुलांचा तसेच व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुन्हा घरी पाठविण्याचे काम ‘ऑपरेशन मुस्कान’द्वारे करण्यात येत आहे. परंतु नागरिकांनी देखील कोणी बेवारस अथवा भीक मागताना, बालमजुरी करताना मुले दिसली तर आमच्याशी संपर्क साधावा.
-दत्ता नलावडे, उपायुक्त (प्रतिबंध)

























































