खराब हवामानामुळे पेरू व डाळिंबाचे भाव पडले, शेतकरी चिंतातूर

अवकाळी पावसाने नुकसान होऊनही पंचनामे झाले नाही. तसेच नुकसान भरपाई मिळनार की नाही ही चिंता सतावत असतानाच खराब हवामानाने पेरू आणि डाळिंबाचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे.

पेरू व डाळिंब पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील या फळ पिक उत्पादकांना गेल्या पाच वर्षापासून विविध संकटांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. चार वर्ष दुष्काळ व पाण्याच्या टंचाईमुळे फटका बसला, तर या वर्षी उशीरा पाऊस झाल्याने बागा लेट फुलल्या. ऐन बहरात असताना अवकाळी पावसाने या बागांचे मोठे नुकसान झाले. फुल कळी गळून गेली. सरकारने वाऱ्यावर सोडले पावसाच्या नुकसानीतून या पिकांना वगळले असताना जो थोडा फार माल झाडावर होता. तो काढणीला आल्यावर बाजार भाव कोसळल्याने व बदलत्या हवामानामुळे मालाची प्रतवारी टिकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पेरू हंगाम यावेळी अडीच महिने उशीरा सुरू झाला. त्यामुळे गुजरात मध्यप्रदेश या मोठी मागणी येथील पेरू व डाळिंबाला असते मात्र तेथील पेरू सुरू झाल्याने तसेच आवक वाढल्याने बाजार भाव गडगडले तर मुंबईत महानगर पालिकेकडून पेरू विक्रेते फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाई मुळेही काही प्रमाणावर विक्रीवर परीणाम झाला. तसेच गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ हवामाना मुळे कच्चा माल पक्का झाल्याने मंदीत आणखी भर पडल्याचे व्यापारी सांगत आहे. मागील महिन्यात सहाशे रूपये दर असलेला पेरू आता कॅरेटला अवघा तीनशे रूपयावर आल्याने बागांवर केलेला लाखो रूपयांचा खर्चही वसूल होताना दिसत नाही. महागडी औषधे, वाढलेली मजुरी याचा ताळमेळ लागेनासा झाला आहे. पिवळ्या पेरूलाही विविध कंपन्यांकडून योग्य दर मिळत नाही. त्यामुळे पेरू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

तर सततच्या अवकाळी पावसामुळे लाख मोलाचे डाळिंब पिक होत्याचे नव्हते केले. तयार होत आलेल फळ या पावसामुळे खर्डी रोगाने खराब झाले. प्रत घसरल्याने बाजारपेठेत या फळाला मागणीच नाही. त्यामुळे मातीमोल भावात डाळिंब विकावे लागत आहे. जे चांगल्या प्रतीचे फळ आहे. त्यालाही मागणी कमी असून बाहेरील राज्यातील डाळिंब सुरू झाल्याने मागणी घटली. हे पीक घेताना आतापर्यंत लाखो रूपये खर्च झाले असून रासायनिक खते, महागडी औषधे यांचे पैसेही या उत्पनातून वसूल होत नाही. तर या कमी प्रतीच्या मालाला कोणीही घेतच नाही. प्रोसेसिंग कंपन्याही कमी दरात मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादकांनाही या वर्षी मोठा फटका बसला आहे.

सरकारने पेरू व डाळींब उत्पकांना अवकाळी पावसाच्या नुकसानीत समावेश करून तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पेरू व डाळिंब पिकांचे विमे भरले आहे. कंपन्यांनी वेळीच नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे. दर वर्षी शेतकऱ्यांना विमा नुकसान देताना विमा कंपन्यांचा अनुभव चांगला नसून सरकारने यात लक्ष घालण्याची गरज आहे, असं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या