ठेवीदार संरक्षण कायद्यात सुधारणा करणार

उरणच्या पिरकोनमध्ये रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 39 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

आर्थिक लाभाच्या आशेने  पैशांची  गुंतवणूक केलेल्या आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यात सुधारणा केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. प्रश्नोत्तराच्या तासांत प्रशांत ठाकूर यांनी उरण तालुक्यातील (जि . रायगड) पिरकोन येथे रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी  या प्रकरणात गुंतवणूकदारांची 39 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती दिली. यासंदर्भात  सत्र न्यायालयाने आरोपीला दिलेला जामीन  पोलिसांनी रद्द करून घेतला आहे. आरोपीकडून 9 कोटी रुपयांची रोख रक्कम, बँक खात्यातील 10 कोटी रुपये आणि दीड कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

संरक्षण कायद्यात नेमकी सुधारणा काय असावी यासंदर्भात अभ्यासगट नेमून तीन महिन्यांत अहवाल घेतला जाईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.