‘त्या’ नियमांत बदल व्हायला हवा, आंतरराष्ट्रीय नेमबाज पूजा घाटकरचे सरकारकडे साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व लॉकडाऊनचा फटका नेमबाजी या खेळालाही बसलाय. मे महिन्याच्या अखेरपासून शूटिंग रेंज सुरू झाल्यात. पण यासाठीही काही अटी-शर्थी ठेवण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचे संकट संपल्यानंतर नेमबाजी पूर्वपदावर येईल. मात्र, या खेळामध्ये करिअर करणाऱया खेळाडूंना आणखी एक बाब प्रकर्षाने सतावतेय. या खेळामध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या उपस्थितीनुसार वेतन दिले जाते. ज्यावेळी हे खेळाडू स्पर्धांसाठी बाहेर जातात, तेव्हाच त्यांना सवलत देण्यात येते. सरावासाठीही त्यांना ही सवलत देण्यात येत नाही. या लॉकडाऊनमध्ये उपस्थिती नसल्यामुळे अशा नेमबाजांना वेतनही मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नेमबाज पूजा घाटकर हिच्याशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला असता, ती म्हणाली, ‘एक खेळाडू म्हणून आम्हाला नोकरी देण्यात येते. त्यावेळी आम्हाला काही सवलती देणे आवश्यक आहे. सरावासाठी तरी काही नियम शिथिल करायला हवेत,’ असे पूजा घाटकरला वाटते.महाराष्ट्र सरकारसमोर तिने आपली व्यथा मांडली आहे.

pooja-ghatkarpooja

नेमबाजांना मास्क घालून खेळता येणार नाही
‘कोरोनामुळे इतर खेळांवर फरक पडेल. मुख्यत: सांघिक खेळांमध्ये काही बदल करावे लागतील. पण नेमबाजीमध्ये जास्त प्रमाणात बदल होतील, असे वाटत नाही. स्पर्धेदरम्यान दोन नेमबाजांमध्ये एक मीटरचे अंतर असते. कोरोनानंतर कदाचित दोन नेमबाजांमधील एक जागा खाली ठेवण्यात येईल. 10 मीटर प्रकारात एसीची आवश्यकता असते. पण 25 मीटर व 50 मीटरमध्ये एसीची आवश्यकता नसते. शिवाय कोरोना संसर्ग दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालणे अनिवार्य असते. पण या खेळामध्ये मास्क घालता येणार नाही,’ असे पूजा घाटकर स्पष्टपणे म्हणाली.

सरकार आपल्या परीने प्रयत्न करतेय
‘नेमबाजी हा महागडा खेळ आहे. रायफल, पिस्तोल, गोळ्या या सर्व बाबींसाठी लाखो रुपये लागतात. पण महाराष्ट्र सरकार या खेळाला व त्यामधील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. सध्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर यांसारख्या ठिकाणी चांगल्या शूटिंग रेंज आहेत. सरकारकडून प्रबोधिनीद्वारे गुणवान खेळाडूंचा शोध घेतला जातोय. मी, राही सरनोबत प्रबोधिनीमधूनच पुढे आलोय. लॉकडाऊनमुळे निराश न होता, युवकांनी थोडा संयम ठेवायला हवा.’ असे पूजा घाटकर यावेळी आवर्जून म्हणाली.

सराव, मेडिटेशन अन् योगा…
‘लॉकडाऊनमध्ये मला प्रत्यक्षात शूटिंग रेंजवर जाऊन सराव करायला मिळाला नाही. पुण्यातील बालेवाडी हे कोविड सेंटर म्हणून वापरण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या काळातही तेथे सराव करायला मिळेल, असे वाटत नाही. पण मी घरच्या घरी सराव केला. लॅपटॉपच्या साहाय्याने ‘होल्डिंग’चा सराव केला. याच दरम्यान दररोज मेडिटेशन व योगाही करतानाच फिटनेसवरही लक्ष दिले,’ असे पूजा घाटकर म्हणाली.