
मुंबईत या वर्षी ‘पोओपी’च्या मूर्तींना परवानगी देण्यात आली असली तरी घरगुती उत्सवातील ’पीओपी’च्या गणेशमूर्तींना नैसर्गिक तलाव-जलाशय आणि समुद्रात विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पीओपी’च्या मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने पालिकेने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सव समन्वय समितीच्या मागणीनुसार केवळ या वर्षासाठी ‘पीओपी’च्या मूर्तींना परवानगी देण्यात आली असून मूर्तीच्या उंचीचेही बंधन ठेवण्यात आलेले नाही. मात्र ‘पीओपी’च्या मूर्तीचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने नैसर्गिक जलाशय-तलाव आणि समुद्रात या मूर्तींच्या विसर्जनासाठी बंदी घालण्यात आल्याचे उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितले.
पालिकेचे आवाहन
- ‘पीओपी’च्या मूर्ती विरघळत नसल्याने या मूर्तींचा गाळ विहिरी, तलाव, जलाशयात साचून नैसर्गिक जिवंत झरे बंद होतात.
- ‘पीओपी’च्या मूर्तींवर रासायनिक रंगांचे लेपन असते. त्यामुळे विसर्जनानंतर जलप्रदूषण झाल्याने जलचरांनाही धोका निर्माण होतो.
- त्यामुळे गणेशोत्सवासाठी शक्यतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी न करता पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी कराव्यात.
- घरगुती मूर्तींची उंची दोन फुटांची असावी. जेणेकरून पालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलावात विसर्जन करताना सोयिस्कर ठरेल.
या वर्षी मंडळांच्या मूर्तींना सूट
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सवादोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये घरगुती मूर्ती सुमारे दोन फुटांपर्यंत उंचीच्या असतात, तर पालिकेच्या कृत्रिम तलावांत चार ते पाच फुटी गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा असते. मात्र मंडळांच्या मूर्ती दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असतात. त्यामुळे केवळ या वर्षासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला नैसर्गिक जलाशय-तलाव, समुद्रात मूर्तीच्या विसर्जनाची परवानगी राहणार आहे. शिवाय 2023 पासून ‘पीओपी’च्या मूर्तींना बंदी राहणार असल्याचे पालिकेने याआधीच जाहीर केले आहे.































































