पॉप्युलर फ्रंटचा सहावा आरोपी नांदेडातून अटकेत, 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधितांवर सध्या देशभरात कारवाई सुरू आहे. या दरम्यान नांदेडमधून फरार झालेला सहावा आरोपी आबेद अली मोहम्मद महेबूब अली (40) याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

21 सप्टेंबर रोजी नांदेडच्या एटीएस पथकाने पॉप्युलर ऑफ इंडियाच्या पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील एक नांदेडचा तर चार परभणीचे आरोपी होते. यात मोहम्मद मेहराजोद्दीन अब्दुल हई अन्सारी (42, रा.हैदरबाग) आणि अब्दुल सलाम अब्दुल कय्युम (34), मोहम्मद निसार मोहम्मद अब्दुल रशिद (41), मोहम्मद जावेद मोहम्मद शब्बीर अन्सारी, मोहम्मद अब्दुल करीम अब्दुल हलीम (37, रा.परभणी) अशा पाच जणांना ताब्यात घेतले होते.

22 सप्टेंबर रोजी या पाचही जणांना नांदेडच्या न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. पोलिसांनी त्या दिवशी यातील एक आरोपी फरार असल्याचे नमूद केले होते. पोलीस उपअधीक्षक पानेकर आणि पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री फरार असलेला आबेद अली मोहम्मद महेबूब अली यास काल रात्री नांदेड येथे अटक केली.

मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सय्यद अरीबोद्दीन यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश किर्ती जैन देसरडा यांनी या आरोपीला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. आबेद अली मोहम्मद महेबूब अली याचे देगलूर नाका परिसरात एक ऑटोमोबाईल्सचे दुकान असून, त्याचे शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण झाले आहे.