हिंमत सबसे बडी व्हॅक्सिन है…लाइफलाइन कोविड सेंटरचा निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरली तरी आता ही लाट बऱयापैकी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णसंख्या बऱयापैकी कमी होत आहे. पूर्वी रुग्ण बरे होण्यासाठी पंधरा दिवस लागायचे ते आता सात दिवसांत बरे होऊ लागले आहेत. त्यासाठी औषधोपचारांच्या जोडीला रुग्णाची मानसिक स्थितीही मजबूत असणे आवश्यक आहे. सकारात्मकता आणि हिमतीमुळे कोरोनावर सहजपणे मात करता येते. कारण हिंमत सबसे बडी व्हॅक्सिन… हे आता ‘लाइफलाइन’च्या कोविड सेंटरमधील उपचाराअंती सिद्ध झाले आहे.

मुंबईतील लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस या वैद्यकीय क्षेत्रातील आघाडीच्या रुग्णालयाकडे मुंबईतील तीन कोविड रिकव्हरी सेंटर्स आहेत. या सेंटरमध्ये दाखल झालेले रुग्ण, उपचार पद्धती जाणून घेतली असता सेंटरमध्ये दाखल झालेल्या दहा रुग्णांपैकी नऊ रुग्ण खणखणीत बरे होऊ घरी जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या सेंटरच्या कामाची दखल घेऊन कोविड सेंटर व सेंटरमधील टीमचा ‘कोविड वॉरियर’ प्रमाणपत्र व कोविशिल्डची ट्रॉफी देऊन खुद्द  महापौर किशोरी पेडणेकर यांनी सन्मान केला आहे.

 रुग्णांच्या प्रतिसादामुळे ऊर्जा

या कोविड सेंटरच्या कामाची मुंबई महापालिकेने दखल घेतली आहेच, पण रुग्णांकडून येणाऱया प्रतिसादाचे प्रमाणही प्रचंड आहे. सुरुवातीला बेड मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे असंख्य फोन येतात. त्यानंतर रुग्ण बरे होऊन घरी गेल्यावर येणारे सकारात्मक मेजेस आमच्या सेंटरला कामची नवीन ऊर्जा देतात, असे लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसचे संचालक सुजीत पाटकर सांगतात. रुग्णांचे पाठबळ व  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे आम्हाला कोरोनाच्या विरोधात लढण्याचे बळ मिळत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

मानसिक बळ सर्वात मोठी लस

या सेंटरमध्ये औषधांच्या जोडीला रुग्णांमध्ये सकारात्मकता आणण्याचे सर्वात महत्त्वाचे काम होते. रुग्णाला साधे सोपे व्यायाम व आयुष्यात सकारात्मकता आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन होते. काय करावे आणि काय करू नये, अगदी जेवण, राहणीमान व स्वच्छतेपर्यंतच्या सर्व टीप्स रुग्णांना देतो, त्यांच्यात  सकारात्मक ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणूनच अगदी वयाची नक्वदी पार केलेले रुग्णही बरे होऊन हसत खेळत घरी जातात. कोविड रुग्णांची मानसिक स्थिती महत्त्वाची आहे. मानसिकरीत्या मजबूत राहिले तर सहजपणे कोरोनावर मात करता येते हे आता सिद्ध झाले आहे, असे सुजीत पाटकर सांगतात. मजबूत मानसिक बळ ही सर्वात मोठी लस आहे. कारण ‘डर सबसे बडा व्हायरस है और हिंमत सबसे बडा व्हॅक्सिन है’ असल्याचे ते आवर्जून सांगतात.

सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचा

अकरा दिवसांच्या लढाईनंतर मी आज बरा होऊन घरी परतत आहे. हा संपूर्ण काळ आपल्याला बरेच काही शिकवून जातो. मुळात या संपूर्ण काळात मनात अनेक नकारात्मक विचार येतात, परंतु या सर्वांवर मात करीत आपण सकारात्मक विचारांना महत्त्व दिले पाहिजे. या वेळेत कुटुंब, मित्रपरिवार आणि डॉक्टरांची मिळणारी साथ खरंच खूप मोलाची होती. त्यामुळेच कोरोनावर मात करू शकलो आहे. मी फार्मा कंपनीत काम करत असल्यामुळे आपल्यावर सुरू असलेले उपचार हे उत्तम सुरू आहेत याची जाणीव होती.  या संपूर्ण काळात बीकेसी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दिली जाणारी सुविधा खरंच वाखाणण्याजोगी होती. आपला जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचाऱयांची सुरू असलेली सेवा आणि धावपळीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपल्याला जर कोरोनावर मात करायची असेल तर घराबाहेर न पडता सुरू असलेल्या लॉकडाऊनला सहकार्य गरजेचे आहे.

-दुर्गेश चिपळूणकर, जोगेश्वरी

  • राज्यात मंगळवारी एकूण 67 हजार 752 रुग्णे बरे होऊन घरी परतले आहेत.
  • मुंबईत उपचार घेऊन घरी परतणाऱयांची संख्या 8 हजार 240 इतकी आहे.
  • राज्यातील रुग्ण बरे होणाऱयांचे प्रमाण 83.21 टक्क्यांवर पोहचले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर 1.5 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
  • राज्यभरात 42 लाख 64 हजार 936 होम क्वारंटाइन आहेत तर 30,146 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.