लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या तोंडाला कुलूप; विषाणूचा संसर्ग, ऑक्टिव्ह रुग्णसंख्येसह मृत्यूदर घटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा कहर रोखण्यासाठी केंद्राच्या घोषणेची वाट न बघता लॉकडाऊन लागू करणाऱ्या राज्यांमध्ये कोरोनाच्याच तोंडाला कुलूप लागले आहे. विषाणूने जबडा आणखी पसरण्याआधीच त्याला ठेचण्यात महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. वेळीच निर्बंध लावल्यामुळे विषाणूचा संभाव्य वाढता फैलाव, ऑक्टिव्ह रुग्णसंख्या आणि मृत्युदर नियंत्रणात आला आहे. या राज्यांच्या पुढाकाराचा संपूर्ण देशाच्या आकडेवारीवर सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. हा कहर वेळीच रोखण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सुविधा भक्कम करण्यासह देशव्यापी लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी झाली. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये मशगूल राहिलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे कोरोना फैलावाकडे दुर्लक्ष झाले. यावेळी महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी विविध उपाययोजना राबवल्या तसेच निर्बंध कडक केले. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणची वर्दळ नियंत्रणात आल्यामुळे विषाणूचा वाढलेला फैलाव पुन्हा उतरणीला लागला आहे. देशात गेल्या आठवडय़ात सलग चार दिवस दररोज 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत होते, तर बळींचे प्रमाणही 4 हजारांच्या वर गेले होते. मात्र राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कठोर करताच नवीन रुग्णसंख्या 4 लाखांच्या खाली, तर बळींचे प्रमाण 4 हजारांच्या खाली आले आहे.

यूपी, झारखंडमध्ये अंमलबजावणी फेल

उत्तर प्रदेश व झारखंडमध्ये लॉकडाऊन लावले गेले, मात्र त्याची नीट अंमलबजावणी होऊ न शकल्यामुळे कोरोनाचा कहर ‘जैसे थे’ राहिला. उत्तर प्रदेशात लॉकडाऊन काळातच ऑक्टिव्ह रुग्णसंख्या 3.1 लाखांवर गेली होती. त्यानंतर आता कुठे पॉझिटीव्हीटी रेटमध्ये केवळ 5 टक्क्यांची घट झाली आहे. झारखंडने दोनवेळा निर्बंध वाढवले. मात्र अजूनही राज्याचा पॉझिटीव्हीटी रेट चिंताजनकच आहे.

लॉकडाऊननंतर कुठे, कशी परिस्थिती?

महाराष्ट्र – राज्यात 5 एप्रिलला मिनी लॉकडाऊन लागू झाले. पुढे वेळोवेळी निर्बंध कठोर केले. आता 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. सुरुवातीला काही दिवस 50 हजारांच्या वर राहिलेली नव्या रुग्णांची संख्या आता 50 हजारांच्या खाली आली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासांत 60 हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले. मुंबईतही संसर्ग नियंत्रणात आला आहे.

दिल्ली /बिहार – दिल्लीने 19 एप्रिलला लॉकडाऊन लावला, तर 26 एप्रिलपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली. पॉझिटीव्हीटी रेट 35 टक्क्यांवरून 23 टक्क्यांवर आला आहे. मृत्युदरही घटला आहे. बिहारमध्येही लॉकडाऊनमुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत घट झाली असून रिकव्हरी रेट 80.71 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच ऑक्टिव्ह रुग्णसंख्येत 1,10,804 पर्यंत घट झाली आहे.

मध्य प्रदेश / छत्तीसगढ – मध्य प्रदेशात सर्व मोठय़ा जिल्ह्यात 10 एप्रिलपासून कर्फ्यू लावला आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 26 टक्क्यांवरून 17 टक्क्यांवर घटला आहे. छत्तीसगढमध्येही कोरोना फैलावाचा वेग मंदावला आहे. पॉझिटीव्हीटी रेट 26 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आला आहे.