
देशातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणजे टपाल विभाग (पोस्ट ऑफिस) देखील म्युच्युअल फंड विक्रीचे एक माध्यम बनणार आहे. पोस्टमन तुमच्या घरी म्युच्युअल फंड घेऊन येणार आहेत. यासंदर्भात असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया आणि इंडिया पोस्टने एक मोठा करार केला आहे. एक लाख पोस्टमास्तरांना ट्रेनिंग दिले जाणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही आर्थिक सेवा पोहोचेल.
टपाल खाते आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांच्यामध्ये 22 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2028 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करार झाला आहे. त्यानंतरही हा करार वाढवला जाऊ शकतो. टपाल खाते कराराच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. याचा लाभ गाव आणि छोट्या शहरात राहणाऱ्या लोकांना होईल.
दरवर्षी सुमारे 30 हजार नवे वितरक म्युच्युअल फंड व्यवसायात सामील होतात. त्यापैकी जेमतेम 10 हजार जण टिकून राहतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात म्युच्युअल फंड पोहोचवण्यासाठी नव्या वितरकांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. आता नागरिक पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सहजतेने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतील.
टपाल खात्याचे कर्मचारी आता म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर म्हणून काम करतील. ग्रामीण भागात आणि छोट्या शहरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्युच्युअल फंडरूपी गुंतवणूक पर्यायाची माहिती पोचेल.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे मुख्य कार्यकारी वेंकट एन चलासानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमासाठी सुरुवातीला चार राज्यांची निवड करण्यात आली आहे. बिहार, आंध्र प्रदेश, ओडिसा, मेघालय या चार राज्यांत कॉलेज विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. सुमारे 20 हजार म्युच्युअल फंड वितरक तयार केले जातील.