चार दिवसांच्या पावसाने नगर शहरातील रस्त्यांची चाळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिलिंद देखणे

शहरामध्ये गेल्या चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नगरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून रस्त्यांची अर्धवट कामे करणाऱया ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाकडून होत असल्यामुळे नगरकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नगर शहरातील चितळे रोड, गंजबाजार, नवी पेठ, लक्ष्मीबाई कारंजा, जुने कोर्ट, तसेच दिल्लीगेट परिसर, जुनी महापालिका, कापड बाजाराचा भाग, तसेच माळीवाडय़ातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पायी चालणेही अवघड झाले आहे. 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नगर शहरातील रस्त्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, संबंधित ठेकेदाराने पाच वर्षे उलटून गेले तरी काम सुरू केले नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यानंतर ठेकेदाराने चितळे रस्त्याचे काम सुरूही केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे कामही बंद पडले आहे.

शहरात 10 कोटी रुपयांच्या निधीतून सर्व कामे करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, पाच वर्षे उलटूनही हा पैसा तसाच पडून आहे. त्यातच संबंधित ठेकेदाराने अजून पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. दिवसेंदिवस शहरातील रस्त्यांची दुरवस्था वाढत आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.

वारंवारचे खोदकाम रस्त्यांच्या मुळावर

दुसरीकडे शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे मुख्य नगर-संभाजीनगर रस्ता सध्या बंद आहे. त्यामुळे शहराअंतर्गत रस्त्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्तेदुरुस्तीचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज होती. दरवेळी रस्त्यांची कामे झाल्यानंतर वेगवेगळी कारणे देत ते रस्ते पुन्हा खोदले जातात. त्यानंतर त्याची दुरुस्ती होत नसल्याने शहरातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.