वाड्यातील विद्यार्थी, रुग्णांची आठ किमी फरफट; निंबवली-पालसई रस्त्याची चाळण, वाहतूक बंद

धुवांधार पावसात निंबवली-पालसई या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे मिनीडोअर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी आपल्या गाड्या बंद केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, रुग्णांना आठ किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करावा लागतो. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम न झाल्याने ही भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यांच्या दुर्दशेने वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे.

निंबवली-पालसई हा रस्ता 17 किलोमीटर अंतराचा आहे. यातील 12 किलोमीटरचा रस्ता दोन वर्षांपूर्वी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराने बनवला आहे. निकृष्ट कामाची धुवांधार पावसाने पोलखोल केली आहे. पावलापावलावर गुडघाभर खखड्डे पडले आहेत. या खड्ड्यां मध्ये मिनीडोअर आणि प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांना तब्बल आठ किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करावा लागतो. कोशिमशेत, नांदणी, गायगोठा, अंबर भुई आदी गावांसह 15 गाव पाड्यातील वाहनचालकांना मानदुखी, कंबरदुखीचे आजार सुरू झाले आहेत. या भागातील समस्या सोडविण्याचे आश्वासन मिंध्यांचे आमदार शांताराम मोरे यांनी नागरिकांना दिले होते.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
निंबवली-पालसई मार्गाची पावसात पुरती दुरवस्था झाली असून हा मार्ग खड्यांनी व्यापला आहे. या दुरवस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आवाज उठवला असून, पक्षाचे तालुका सचिव सागर पाटील यांनी खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.