मुंबईतील पवई तलाव भरुन वाहू लागला

1632

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 12.59 लाख रुपये एवढा खर्च त्याकाळात आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते. या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही 195 फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावात 545.5 कोटी लीटर पाणी असते. तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाने तलाव भरून वाहू लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या