
पालघर-बोईसर केंद्राच्या अरहान पटेलने 183 धावांची खेळी करत आपल्या संघाला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय मिळवून दिला. 33 व्या कल्पेश कोळी स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात वाशी केंद्राच्या 209 धावांना उत्तर देताना पालघर-बोईसर पेंद्राने 5 बाद 312 धावा उभारत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.
कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर रंगलेल्या या सामन्यात अरहान पटेलने दुसरा दिवस गाजवला. पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे मोजक्याच षटकांचा खेळ झाला होता. रविवारी अरहान पटेलने वाशी केंद्राच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत 26 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर दीडशतकी खेळी साकारली.
अन्य सामन्यांत हर्ष कदम आणि समृद्ध भट यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ठाणे पेंद्र ‘अ’ संघाने दुसऱ्या दिवशी 6 बाद 343 धावांचा डोंगर उभा केला. चेंबूरच्या आरसीएफ मैदानावर रंगलेल्या या सामन्यात हर्ष कदमने 119 चेंडूंत 100 धावा तर समृद्ध भटने 147 चेंडूंत 109 धावा फटकावल्या. त्याचबरोबर विरारच्या अवर्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मालाड पेंद्राचा पहिला डाव 48.1 षटकांत 151 धावांवर संपुष्टात आला. त्यात स्वयम वामने आणि अद्वैत भट यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवले. प्रत्युत्तरादाखल कांदिवली पेंद्राने 8 बाद 218 धावा रचत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय साकारला. कांदिवली पेंद्राच्या अंश पटेल याने 82 चेंडूंत 15 चौकार आणि 2 षटकारांनिशी नाबाद 101 धावांची खेळी उभारली.





























































