
>> प्रभा कुडके
पहलगामला दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर कश्मीर कव्हर करण्यासाठी जाण्याचा योग आला. हल्ल्यानंतरची शांतता आणि दिवसाउजेडी दिसणारा ‘काळाकभिन्न’ अंधार प्रत्येक कश्मिरीच्या नजरेत पाहायला मिळाला. भरदिवसा कश्मिरींच्या चेहऱ्यावर अंधार दाटून आलेला होता. पहलगाममधील झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर कश्मीरची त्या वेळची स्थिती काय आहे हे अनुभवण्यासाठी कश्मीर गाठले होते. त्या वेळी कश्मीरच्या गारठ्यापेक्षा दहशतीची धग अधिक जाणवली. ‘गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं …’ (जर पृथ्वीवर स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे.) ही उक्ती कश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याला अगदी तंतोतंत लागू पडते.
कश्मीरमधल्या छोटय़ा गावामध्ये गेल्यावरही आपण जणू स्वप्नातील एखाद्या गावात फेरफटका मारत आहोत असाच भास होतो. छिन्न, खिन्न आणि उद्विग्न अशीच कश्मीरमधील प्रत्येक मनाची अवस्था होती. कश्मीरची कळी कोमेजली नव्हती, तर ती अक्षरश गळून पडली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर कश्मीरच्या हवेतला गारठा मन सुन्न करणारा होता. सुन्न पडलेल्या स्थानिक बाजारपेठा, खिन्न कश्मिरींचा चेहरा डोळ्यांना अगदी स्पष्ट दिसत होता. कश्मीरची धरती आणि दहशतवाद या दोन्ही गोष्टी कायमच हातात हात धरून चालत होत्या, परंतु या दहशतवादाच्या धुमश्चक्रीत कायमच इथला प्रामाणिक एकनिष्ठ नागरिक भरडला गेला होता आणि आजही भरडला जात आहे. इथल्या नागरिकांमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भविष्यातील आशेचा किरण पुसल्यात जमा होता हेच चित्र जागोजागी दिसून आले. दुभंगलेल्या कश्मिरींसाठी आता एक फुंकर मायेची हवी. दहशतवादाने कंबरडे मोडलेले कश्मीर गलितगात्र आहे. सुन्न, खिन्न, भयाण अंधार इथल्या खोऱ्यातील प्रत्येक गावात दिसून आला.
ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला ते बैसरन खोरेही या कश्मीर भेटीत गाठले. पहलगामपासून अवघ्या काही मिनिटांवर असलेल्या बैसरन खोऱ्यातच 22 एप्रिलला मृत्यूचे भयावह तांडव झाले होते, याच ठिकाणी पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. बैसरन खोरेसुद्धा एकदम सुनसान होते. नुकत्याच झालेल्या घटनेचे पडसाद बैसरनच्या खोऱ्याच्या कणाकणांत किंकाळ्या आणि रडण्याचे अनामिक आवाज घुमत होते. बैसरनची बिकट वाट आणि पर्यटकांवर झालेला तो हल्ला याचा विचार करताना मेंदू काम करेनासा झाला होता. निबीड घनदाट देवदारांच्या वनराईत इथे कधी काय होईल याची खात्री देता येणार नाही असे हे बैसरनचे गूढ खोरे. दाट देवदारांच्या गर्दीत मृत्यूलाही भय वाटेल असे भयावह कृत्य दहशतवाद्यांनी केले होते. बैसरन खोऱ्याची चिखलाची वाट आणि पर्यटकांचे मृतदेह आणणारे स्थानिक असे चित्र लगेच नजरेसमोर उभे ठाकले. बैसरनचा चढ चढत इथल्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्नही या भेटीत केला. प्रत्येक पावलागणिक हा चढ मृत्यूकडे आणि आपल्या माणसाच्या वियोगाकडे नेईल अशी कल्पनाही 22 तारखेला कुठल्याही पर्यटकाने केली नसेल, पण अखेर ते भयावह कृत्य खोऱ्यात घडले होते. बैसरनचा चढ हा अतिशय बिकट असून इथे चढताना केवळ घोडा किंवा खेचर याचाच काय तो आधार. अशा परिस्थितीमध्ये हल्ल्याच्या दिवशी जीव वाचवणारे खाली कसे आले असतील याची कल्पना करवत नव्हती.
धरतीवरच्या नंदनवनाला दहशतवाद्यांच्या काळ्या कृत्याचे डाग हे काही आज लागलेले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून कश्मीरचे खोरे आणि दहशतवाद हे समीकरण तयार झालेले आहे. कश्मीरचे सौंदर्य कायमच दहशतीच्या इर्दगिर्द वेढलेले होते. दहशतवाद पोसला गेला होता आणि याच नंदनवनात अनेक ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले. धरतीवरच्या या नंदनवनाची छिन्नविच्छिन्न अवस्था इथल्या काही दिवसांच्या भेटींमधून ठळकपणे अनुभवता आली. कश्मीरच्या भेटीत ज्या घरांमध्ये डोकावले आणि एकूणच पहलगाम हल्ल्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचे केवळ म्हणणे होते, “आमचे नेमके चुकले तरी कुठे?’’ सध्याच्या घडीला कश्मीरमध्ये पर्यटनाचा सीझन होता. आता या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरलेली दिसून आली. गेल्या चार वर्षांपासून कश्मीरातले पर्यटन जोर धरू लागले होते, परंतु पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे कश्मीरकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तुरळक पर्यटकांव्यतिरिक्त कश्मीरच्या भेटीत फारसे पर्यटक दिसून आले नाहीत. दहशतीच्या खोऱ्यातले प्रत्येक स्थानिकाचे पाऊल हल्ल्यानंतर जड झालेले होते. जागोजागी दिसणारे प्रत्येक दृश्य मनावर ओरखडे उठवणारेच होते. गलितगात्र झालेला कश्मिरी शून्य नजरेने भविष्याच्या चिंतेत दिसून येत होता. कश्मीरचा शिकारा, हाऊसबोट, हॉटेल्स ओस पडली होती. पर्यटकांची एक झलक दिसावी म्हणून कश्मिरी आतुरलेले होते.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे इथला स्थानिक नागरिक चांगलाच हादरलेला आहे. रोजंदारीवर पोट असलेला प्रत्येक नागरिक हा पर्यटनाच्या साखळीत बांधला गेलेला आहे. त्यामुळेच आता घरी चूल पेटणार की नाही, हीच भ्रांत कश्मिरींना या घडीला लागलेली आहे. देशभरातून सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्रातून कश्मीर फिरण्यासाठी जात होते. हल्ल्यानंतर श्रीनगरचा लाल चौक आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये गूढ शांतता अनुभवायला मिळाली. पर्यटकांना वाचवणाऱ्या आदिल शाह याच्या हापतनार गावालाही भेट दिली. आदिलच्या घरच्यांशी संवाद साधला. घरच्यांच्या नजरेत सुकलेले अश्रू आणि भविष्याची चिंता हेच केवळ तिथे पाहायला आणि अनुभवायला मिळाले. आदिलच्या घराकडे सध्याच्या घडीला व्हीआयपी आणि राजकारण्यांची गर्दी वाढली होती. ही गर्दी काही दिवसांनी नक्कीच ओसरेल यात वाद नाही.
दोन आठवड्यांनंतर हळूहळू कश्मीर पूर्वपदावर येऊ लागले आहे. थोडय़ाफार प्रमाणात का होईना, आता पर्यटक पुन्हा एकदा कश्मीरकडे वळू लागले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या 16 दिवसांनंतर हिंदुस्थानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत दहशतवादावर एअर स्ट्राइकची कारवाई केली. सरकारकडून झालेल्या कारवाईचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. असे असले तरीही कश्मीरच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या दहशतवादाचे काय? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.