आरंभ… प्रभादेवीच्या अनुजाचा ओडीसी नृत्याविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवी येथे राहणारी अनुजा राजेंद्र पाडावे वयाच्या चौथ्या वर्षापासून ओडीसी नृत्य शिकत आहे. अनुजाने प्राचीन कला केंद्र, चंदीगढ येथून नृत्य विशारद केले आहे. लवकरच गंधर्व महाविद्यालयातून ती विशारद होणार आहे. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात रविवारी अनुजाचा मंचप्रवेश झाला. ‘आरंभ… द बिगीनिंग’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना झेलम परांजपे, गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष उपस्थिती होती. ओडीसी नृत्याविष्काराने अनुजाने उपस्थितांचे मन जिंकले.

मंचप्रवेश कार्यक्रमात अनुजाने गणेश तांडव, बिहाग पल्लवी, त्रिदेवी, धर समीरे, भो शंभो, श्रीतकमल, बकुळ पल्लवी आदी सादरीकरण केले. वैष्णवी कला क्षेत्र या संस्थेत गुरु आशा नांबियार यांच्या मागदर्शनाखाली अनुजा ओडिसी नृत्य शिकत आहे. सिद्धीविनायक मंदिर, नाटयांजली फेस्टिवल- मुंबई आणि कोईम्बतूर, इंटरनॅशनल ओडीसी डान्स फेस्टिवल 2021, भुवनेश्वर आदी महोत्सवात सहभाग घेतला आहे.

वैष्णोवी कला क्षेत्र ही संस्था आशा नांबियार यांनी सुरू केली आहे. दिकंगत गुरु नटबर महाराणाजी आणि प्रोतिमा बेदी यांच्याकडून नांबियार यांनी नृत्यप्रशिक्षण घेतले. संस्थेच्या माध्यमतातून त्या नृत्यकलेचा वारसा चालवत आहेत. ओडिसी नृत्य ही ओडिशा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे. यामध्ये त्रिभंग स्करुपाच्या मूर्तीमुद्रेकर भाक आधारित असतात.