
>> प्रभाकर पवार, [email protected]
‘एनडीटीव्ही या मराठी वाहिनीचे कार्यकारी संपादक जितेंद्र दीक्षित यांना ओळखत नाही, असा पत्रकार सापडणार नाही. ‘दोपहर का सामना’पासून आपल्या पत्रकारितेची सुरुवात करणारे जितेंद्र दीक्षित हे पत्रकार जगतातील एक विश्वासार्ह (Reliable/Trustworthy) नाव आहे. एक सचोटीचा व प्रामाणिक पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा या अत्यंत मेहनती पत्रकाराने निवृत्त आयपीएस अधिकारी क्रिशिपाल ऊर्फ के. पी. रघुवंशी यांच्या महाराष्ट्र पोलीस सेवेतील Untold म्हणजे अकथित गोष्टींवर ‘Trouble Shooter’ हे इंग्रजी पुस्तक लिहून खळबळ उडवून दिली आहे.
के. पी. रघुवंशी हे १९८० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. अत्यंत लो प्रोफाईल, प्रसिद्धीपासून दूर, साधी राहणी, शांत स्वभाव, परंतु कर्तव्यात अत्यंत कठोर! १९८० च्या दशकात नव्यानेच पोलीस दलात भरती झालेल्या या अधिकाऱ्याने दंगलीच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या एका राजकारणी युवा नेत्याला बेदम मारहाण केली होती. परंतु तोच युवा नेता कालांतराने केंद्रात मंत्री झाला आणि शिष्टाचाराप्रमाणे के. पी. रघुवंशी यांना त्या युवा नेत्याला सॅल्यूट ठोकावा लागला. अशा या खमक्या अधिकाऱ्याची कार्यशैली, दिमाख पाहून मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त वसंत सराफ हे भारावून गेले होते. त्यांनी माओवादी नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी, त्यांच्या रक्तरंजित चळवळीला आळा घालण्यासाठी के. पी. रघुवंशी यांना आपल्या दालनात बोलावून “गडचिरोलीच्या नक्षल भागात जाशील का?” असा सवाल केला होता. तेव्हा गडचिरोलीच्या भामरागड या अत्यंत धोकादायक भागात कोणत्याही अधिकाऱ्याला शिक्षा (पनिशमेंट) म्हणूनच पाठविले जाते असा समज आहे. त्यामुळे के. पी. रघुवंशी स्तब्ध झाले. त्यांनी थोडा पॉज घेतला. ते थांबले व म्हणाले, “सर, माझी छोटी मुलं आहेत. त्यांची शाळा मुंबईत आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात माझ्या मुलांचे शिक्षण होणार नाही. मला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या।” वसंत सराफांनी रघुवंशी यांची विनंती मान्य केली. दरम्यान, वसंत सराफांचीच मुंबईतून बदली झाली. त्यांना बढती देऊन पोलीस महासंचालक करण्यात आले. त्या वेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. सराफ यांनी मुंबईत उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या रघुवंशी यांच्याकडे पुन्हा विचारणा केली असता रघुवंशी यांनी गडचिरोलीला जाण्यास होकार दिला. तेव्हापासून रघुवंशी यांचा संघर्ष सुरू झाला. त्यावर जितेंद्र दीक्षित यांनी आपल्या ‘ट्रबल शूटर’ या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
१९९० च्या सुमारास के. पी. रघुवंशी यांची पोलीस महासंचालक वसंत सराफ यांनी गडचिरोलीला पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक केली. त्याआधी डॉ. सत्यपाल सिंह यांनी गडचिरोली एसपी म्हणून काम केले होते. रघुवंशी हे आपल्या कुटुंबीयांसह ट्रेनने नक्षल दंडकारण्यात पोहोचले. तेथे डीआयजी म्हणून तुकाराम चौधरी हे वरिष्ठ अधिकारी होते. रघुवंशी यांना चौधरी यांनी सल्ला दिला, “जास्त हुशारी करू नकोस. कोणत्याही हल्ल्याची, बॉम्बस्फोटाची खबर आली तर घटनास्थळी लगेच जाऊ नकोस. खातरजमा करूनच निर्णय घे. तुला मारण्यासाठी नक्षलवादी सापळाही रचतील हे लक्षात ठेव.” तुकाराम चौधरीचा हा सल्ला रघुवंशी यांनी मानला, परंतु त्यांना त्यातून अधिकच प्रेरणा मिळाली. रघुवंशी यांनी नक्षलवाद रोखण्यासाठी नक्षल भागातील तरुणांना सोबत घेऊन ‘सी ६० कमांडो’ नावाचे पथक स्थापन केले. नक्षलवाद रोखण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले. नावीन्यपूर्ण रणनीती आखली आणि वसंत सराफ यांच्या विश्वासाला ते पात्र ठरले. सराफ यांनी रघुवंशी यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचे लेखी कौतुक केले. रघुवंशींनी स्थापन केलेल्या ‘सी-६०’ कमांडोंची संख्या आता ७०० झाली आहे. गडचिरोलीमधील नक्षलवाद संपत चालला आहे. रघुवंशी यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘सी-६०’ पथकाकडून नक्षलवादी मारले जात आहेत हे महाराष्ट्र पोलिसांचे व रघुवंशी यांचे यशच म्हणावे लागेल. जितेंद्र दीक्षित यांनी आपल्या पुस्तकात रघुवंशी यांच्या ३५ वर्षांच्या पोलीस सेवेतील कार्यपद्धतीवर अंगावर शहारे आणणारा प्रकाश टाकला आहे.
नवल भागात रघुवंशी यांनी आपल्या कामाची छाप पाडल्यानंतर इस्लामी अतिरेक्यांचे आव्हान समोर उभे राहिले. मुंबईसह देशभरात आतंक माजविणाऱ्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाची (एटीएस) २००४ साली स्थापना केली. त्याचे प्रमुख के. पी. रघुवंशी यांना करण्यात आले. २००६ च्या जानेवारी महिन्यात रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसकडून नागपाडा येथून नऊ कश्मिरी अतिरेक्यांना शस्त्रे व स्फोटकांसह अटक करण्यात आली. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून क्रॉफर्ड मार्केटसमोरील हज कमिटीच्या गगनचुंबी इमारतीमधून एका इमामासह सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून संभाजीनगर, परभणी, मालेगाव, बीड आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धाडी घालून आरडीएक्स, एके ५६ रायफल, हातबॉम्ब आदी साठा जप्त करण्यात आला. दोन डझन अतिरेक्यांना अटक करण्यात आली. रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली एटीएसला प्रचंड यश मिळत असतानाच मुंबईत रेल्वेत सात बॉम्बस्फोट घडविण्यात आले. एटीएसला हा प्रचंड धक्का होता. मालेगाव येथेही २००६ व २००८ साली हिंदू-मुस्लिमांकडून बॉम्बस्फोट घडविण्यात आले, परंतु कोणताही संबंध किंवा पुरावा नसलेल्या आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी सरकारकडून रघुवंशी यांच्यावर दबाव आणण्यात आला.
माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १९९२-९३ च्या दंगल प्रकरणी अटक करण्यासाठी तर रघुवंशी यांच्या मागे तगादा लावण्यात आला होता, परंतु निःपक्षपाती, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या रघुवंशी यांनी कुणाला जुमानले नाही. मंत्र्याच्या दबावाखाली ते आले नाहीत. उलट रघुवंशी यांचे एकेकाळचे वरिष्ठ असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आर. डी. त्यागी यांना श्रीकृष्ण आयोगाच्या आदेशाप्रमाणे अत्यंत खेदजनक परिस्थितीत रघुवंशी यांनी अटक केली. रघुवंशी निःपक्षपाती होते हेही जितेंद्र दीक्षित यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
रघुवंशी यांचा पोलीस सेवेतील थरारक जीवन प्रवास वाचताना एखादी कादंबरी वाचत असल्याचा भास होतो. प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, उत्कंठा निर्माण होते. ट्रबल शूटर’ हे ३३३ पानांचे व ४९९ रुपये किमतीचे पॅन मॅकमिलनने प्रकाशित केलेले पुस्तक अत्यंत रंजक व वाचनीय झाले आहे. जितेंद्र दीक्षित यांनी त्यासाठी अफाट कष्ट घेतले आहेत. जितेंद्र दीक्षित यांना मी गेली ३० वर्षे ओळखत आहे. त्यांचे गुन्हेगारी जगतातील लिखाण व अनुभव वाखाणण्याजोगे आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जीव धोक्यात घालून त्यांनी रिर्पोर्टिंग केले आहे. त्यांची हिंदी, मराठी व इंग्रजी अशी सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. रघुवंशी व दीक्षित हे खरोखर ‘ट्रबल शूटर’, संकटनिवारक लढवय्ये आहेत.


























































