प्रबोधनकारांचे विचार हत्तीचे बळ देणारे, ज्येष्ठ अर्थतज्ञ देसरडा यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा गांधी यांच्या विचारांबरोबरच देशात कधी नव्हे एवढी प्रबोधनाची आवश्यकता आहे. त्यामुळेच पत्रकार, सामाजिक, राजकीय विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने दिलेला पुरस्कार मला काम करण्यासाठी हत्तीचे बळ देईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. एच.एम. देसरडा यांनी केले. मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने ‘श्रद्धेय प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार’ देसरडा यांना बिहार विधान परिषदेचे सभापती देवेश ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वनामतीच्या सभागृहात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देसरडा म्हणाले, आपल्या देशाला गांधी-आंबेडकरांची महान परंपरा असून त्यांनी दिलेले विचार आणि प्रबोधन हीच आमच्या देशाची संपत्ती आहे. समाजात पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. ते मांडले गेले पाहिजेत. आपल्या वसुंधरेचे संरक्षण करायचे आहे आणि सोबतच देशातील शेतकरी हा अन्नदाता असून तो आज वाचला पाहिजे, असेही प्रा. देसरडा म्हणाले. दरम्यान, प्रा. देसरडा यांचे काम समाजप्रबोधनाचे आहे. त्यांचे काम समाजाला दिशा देणारे आहे, अशी शब्दांत देवेश ठाकूर यांनी देसरडा यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला माजी मंत्री रमेश बंग, कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. गिरीश गांधी, महेश बंग, सुधीर बाहेती आदी उपस्थित होते.