
काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज कॉँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. गुरुवारी सकाळी सर्वप्रथम त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात जाऊन पक्ष प्रवेश केला.
प्रज्ञा सातव या गत काही महिन्यांपासून सातत्याने काँग्रेसवर नाराज होत्या. त्यामुळे त्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. प्रज्ञा सातव यांचे पती राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
राजीव सातव यांच्या निधनानंतर बनल्या आमदार
पती राजीव सातव डॉ. प्रज्ञा या सक्रिय राजकारणात आल्या. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली कॉँग्रेसकडून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.2024 मध्ये दुसऱयांदा त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले.
अत्यंत दुर्दैवी – नाना पटोले
प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भाजपने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहीत नाही. मात्र, भाजप कडून सातत्याने दुसऱया पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले.






























































