साध्वी प्रज्ञासिंग यांना लिफाफा पाठवणारा डॉक्टर जेरबंद

933

भोपाळच्या खासदार तथा भाजप नेता साध्वी प्रज्ञासिंग यांना लिफाफा पाठवून धमकी देणाऱ्या डॉक्टरला नांदेडमधून जेरबंद करण्यात आले. भोपाळ येथील एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंग यांना दोन दिवसांपूर्वी एक संदिग्ध पाकीट आले होते. या पाकिटामध्ये पावडरसह एक उर्दू भाषेत लिहिलेली चिठ्ठी होती. चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या फोटोवर फुली मारण्यात आली आहे. या चिठ्ठीत इसिस तसेच इंडियन मुजाहिदीनचा देखील उल्लेख असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या संदर्भात साध्वी प्रज्ञा सिंग यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक चौकशी केली. चौकशीत त्या पाकिटाचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचल्याचे आढळले. शुक्रवारी भोपाळ एटीएसचे पथक नांदेडमध्ये धडकले. या पथकांनी नांदेडमधून डॉक्टर सय्यद अब्दुल रहमान मोहम्मद त्याला ताब्यात घेतले. या डॉक्टरने साध्वी प्रज्ञासिंग यांना ते पाकीट पाठवल्याचा संशय आहे. या संदर्भात इतवारा पोलीस ठाण्यात नोंद करून एटीएसचे पथक डॉक्टर सय्यद रहमान याला पुढील चौकशीसाठी भोपाळला घेऊन गेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या