
जर्मनीतील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वल सोनवणे याने 17 वर्षे वयोगटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. कोणतेही मानांकन नसलेल्या प्रज्वलने अंतिम लढतीत बेल्जियमच्या प्रथम मानांकित खेळाडूचा पराभव करून नवा इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत थेट सुवर्णपदक मिळविणारा प्रज्वल नाशिकचा पहिला खेळाडू ठरला आहे.
योनेकस येथे 13 ते 17 ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत जगभरातील 64 नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. प्रज्वलने प्राथमिक फेरीच्या पहिल्या सामन्यात हंगेरीच्या पीटर पॉकोविक्सचा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसऱया सामन्यात झेक रिपब्लिकच्या ऍडम शॅनेकला, तिसऱया सामन्यात जर्मनीच्या केज्युल वॅग्नरला हरवून उपउपांत्य फेरी गाठली. या फेरीत बेल्जियमच्या जोहान क्युइंटेनला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. उपांत्य फेरीत तृतीय मानांकित फ्रान्सच्या रेमिंग टाइंगशी संघर्षपूर्णरीत्या लढत देत तिसऱया सेटमध्ये बरोबरी साधली. अंतिम लढत प्रथम मानांकित बेल्जियमच्या बॅप्टिस्ट रोलिनविरुद्ध झाली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत प्रज्वलने 21-12 असा पहिला सेट जिंकला. दुसऱया सेटमध्ये 21-05 अशी सहज खेळी करीत विजेतेपदावर नाव कोरले.
डेन्मार्कला होणाऱया स्पर्धेतही प्रज्वल सहभागी होणार आहे. त्याच्या यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद लखानी, सुंदर शेट्टी, ज्येष्ठ प्रशिक्षक प्रदीप गंधे, श्रीकांत वाड, नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष रंध्याश्याम मुंदडा, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, एस. राजन, योगेश एकबोटे, अनंत जोशी यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

























































