
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना घालवायचे असेल तर विरोधी पक्षांनी जागा वाटपामध्ये न अडकता मोंदींविरोधात एकजुटीने लढा उभारायला हवा. नाहीतर मोदी पुन्हा एकदा बोकांडी बसतील आणि विरोधात आवाज उठवणाऱयांना तिहार तुरुंगात जावे लागेल, असा सावधगिरीचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर स्त्राrमुक्ती दिन परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदींविरोधात एकत्र आलेल्या पक्षांना एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. मात्र विविध पक्ष एकत्र आल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण होऊ शकत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र आलेल्या पक्षांना, ‘जागावाटप गांभीर्याने न घेता मोदींविरोधात लढा उभारण्याचे’ आवाहन केले आहे. देशात एका जातीचा पुजारी नाही तर पदवीधारक पुजारी असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार विरोधी पक्षांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे संविधान मानणाऱया सर्व पक्षांनी सत्ता आणण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
‘कोणी म्हणतेय अमुक जागा लढवेन. कोण म्हणतेय तमुक जागा लढवेन. आम्ही त्यांना म्हणतोय की, पहिल्यांदा जागा सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे? त्यामुळे 2-4 जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका मोदी विरोधात एकत्र आलेल्या पक्षांनी घेतली पाहिजे.’
देशात दबावाचं, दमबाजीचं आणि ब्लॅकमेलिंगचं राजकारण सुरू आहे. मार्च, एप्रिलमध्ये होणाऱया निवडणुका प्रतिक्रांतिवाद्यांना जिंकायच्या आहेत म्हणून हे सगळं चाललंय.
56 इंची छातीत गाठीया, ढोकळा, फाफडा एवढेच आहे. दुसरे काहीच नाही!

























































