
सामना प्रतिनिधी । भिगवण
काँगेस पक्षासोबत युती करावी असे काही नाही परंतु काँगेस पक्षाला 37 ठिकाणी लोकसभेला उमेदवार मिळत नाहीत. त्यामुळे काँगेस पक्ष वाचला पाहिजे असे आम्हाला वाटते. त्यांना जर वाचायचेच नसेल तर आम्हाला त्यांना वाचवण्यात रस नाही. जे पक्ष विकावू आहेत (आरपीआय) त्यांच्याशी आम्ही कधीच युती करणार नाही. वेळच आली तर बहुजन वंचित आघाडी सर्वच्या सर्व जागा लढवेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी भिगवण (ता.इंदापूर) येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
बाबीर देवस्थान रुई (ता.इंदापूर) येथे यात्रेनिमित्त जात असताना आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापार उद्योग विभागाचे उपाध्यक्ष ॲड. महेश देवकाते यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ॲड. विजयराव मोरे, सिकंदर शेख, रामचंद्र इरवाड, ॲड. महेश देवकाते, नवनाथ पडळकर, सचिन बोगावत, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, विक्रम शेलार, शरद चितारे आदी उपस्थित होते.
आंबेडकर पुढे म्हणाले की, ”राजकारणामध्ये सध्या घराणेशाही वाढतच चालली असून त्यांनी आपले चारित्र्य तपासावे. राजकारण्यांनी वंचित घटकाला जाणीवपूर्वक सत्तेत आणणे कधीच घडले नाही. आपण वंचित घटकाला सत्तेत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.” आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, ”मुख्यमंत्री होण्यापेक्षा व्यवस्था बदलवण्याकडे आपले लक्ष आहे. ती बदलण्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, हे सांगून मनुष्यकेंद्रित राजकारण आवश्यक आहे. आत्ताच्या काळात जातकेंद्रित, धर्मकेंद्रित राजकारण आहे. राजकारण मनुष्यकेंद्रित असेल तर सार्वभौम सत्ता निर्माण होते. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यापेक्षा व्यवस्था बदलण्याकडेच आपले लक्ष राहील.”
समाजात वंचितांची संख्या लक्षणीय आहे जातीमधून विकासामधून, व्यवस्थेमधून वंचित असणारांची संख्या जादा आहे. घराणेशाहीची लागण झालेल्याच्या लोकांना वंचित आघाडीच्या सत्तेची लागण झाली आहे. त्यांना भीती वाटु लागली आहे. आपली सत्ता जाणार म्हणून ते दुसऱ्यांवर टीका करु लागले आहेत. यामुळे ते आम्हाला भाजपची बेटी म्हणत असल्याचाही टोला आंबेडकर यांनी लगावला. यावेळी ॲड. महेश देवकाते यांनी आंबेडकर यांचा सत्कार केला. विजयराज मोरे, नवनाथ पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, पंचायत समितीचे सदस्य संजय देहाडे मित्र परिवाराने प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला.






























































