
राज्यात अनेक ठिकाणी दंगली होतायेत, हा काही संघटनांचा अजेंडा आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. नागपूर एसआयटीच्या एका अहवालावर बोट ठेवत प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांत घडलेल्या हिंसक घटनांवर मतप्रदर्शन केले. नागपूर एसआयटीने काही दिवसांपूर्वी अहवाल सादर केला होता. काही ठिकाणी दंगल होणार असा हा अहवाल आहे. तो लोकांसमोर आणला तर आणखी ठिकाणे पुढे येतील, असे नमूद करत त्या अहवालाचे काय झाले? तो अहवाल पुढे आणा म्हणजे लोकांनाही कळेल की दंगली कशा इंजिनीअर्ड आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पाकिस्तानचा हात
राज्यातील शांतता बिघडविण्यात पाकिस्तानचा हात आहे की काय अशी शंका येते, असे अजब तर्कट मांडत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूरसह राज्यातील इतर घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मुस्लिम समाजाने औरंगजेबचा फोटो आणून शांतता बिघडवणे उचित नाही. दोषींवर कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
असे कधीच घडले नव्हते
कोल्हापुरात घडलेला प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृह खात्याची असते. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि आता कोल्हापूर याचा अभ्यास करून याची लिंक आहे की सर्व वेगवेगळ्या घटना आहेत हे पाहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मांडली.
महाराष्ट्राला शोभणारे नाही
महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. सध्या जे घडत आहे ते महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर याची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते, याचे भान राखा. शांतता राखण्यासाठी सर्वांनीच पोलिसांना साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.





























































