
सामना प्रतिनिधी । परभणी
वंचित बहुजन आघाडीस राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. संभाजीनगर येथे एल्गार अधिवेशन घेतले. या अधिवेशनात एमआयएम बरोबर युती केल्यामुळे दोन्ही काँग्रेससह भाजपला पोटशूळ उठले आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. वसमत रोडवरील सावली विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिमांचा मतांसाठी वापर केला
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ मुस्लिम समाजाचा मतांसाठी वापर केला. सत्तेमध्ये दूर ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. या प्रवृत्तीस भाजपा देखील खतपाणी घालत आहे. सध्या धर्म व जातीचा आधार घेऊन राजकारण केले जात आहे. प्रसंगी द्वेषाचे राजकारणही केले जात आहे. सत्तास्पर्धा चांगली पण सत्तेसाठी सर्वकाही हे बरोबर नाही, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.
‘वंदे मातरम’ला आमचाही विरोध, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी
तसेच काँग्रेस बरोबर फक्त एकवेळा बोलणी झाली आहे. काँग्रेस पक्षाचे निर्णय दिल्लीश्वराच्या हातात असल्याने येथील पक्षाध्यक्ष काहीही करु शकत नाही, याचा प्रत्यय आला असल्याचे सांगितले. काँग्रेस बरोबर गेलो तरी एमआयएम साथ सोडणार नाही, याचा पुनरोच्चार करत ही युती तुटणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. काँग्रेसनेच चर्चा थांबविल्या आहेत. काँग्रेसकरीता दरवाजे मोकळे आहेत. पण काँग्रेसचे सर्वेसर्वा हे मौन पाळून आहेत. त्यामुळेच एमआयएम बरोबर युती केली असून स्वाभिमानी शेतकरी संघटने बरोबर बोलणी चालू असल्याचे सांगितले.

























































