
सामना ऑनलाईन । मुंबई
देशात भाजप काँग्रेसला ब्लॅकमेल करीत आहे. काँग्रेसने वंचित आघाडीशी समझोता केला किंवा आघाडी केली तर चौकशी पूर्ण करू. मग पुढची चौकशी जेलमध्ये होईल अशी भाजपने तंबी दिल्यामुळे काँगेसने आघाडी केली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीने 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीच्या आघाडीच्या भूमिकेविषयी बोलताना आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली. आमच्यासोबत आघाडीचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला दिला होता, पण काँग्रेसने आघाडीचा प्रस्ताव फेटाळला. कारण भाजपने काँग्रेसला चौकशीची भीती दाखवून ब्लॅकमेल केले. सोनिया गांधी यांच्या जावयांची सक्तवसुली संचालनालमार्फत चौकशी सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांचीही चौकशी सुरू आहे. म्हणून काँग्रेस केवळ बोलणी करते, पण बोलणी पूर्ण होण्याच्या अगोदरच युती तुटते. भाजपने तंबी दिल्यामुळे निवडणुकीपूर्वी आघाडी करणार नाही याची आम्हाला खात्री आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशभरात काँग्रेसने सर्वांशी बोलणी करण्याचे नाटक केले व वेगळे गेले असाही आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, लष्करप्रमुखांनी आम्हाला उत्तरदायी असले पाहिजे अशी संघाची भूमिका आहे. त्यामुळे आजपर्यंत संघाचे कोणतेही सरसंघचालक कधीही राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या कार्यालयात गेले नाहीत. त्यांनी आमच्यासमोर झुकले पाहिजे अशी संघाची भूमिका राहिली आहे, पण संघाला संविधनाच्या चौकटीत आणले पाहिजे. कारण संविधान हे सर्वोच्च आहे, असे ते म्हणाले.
वंचित आघाडीची वाढती ताकद
आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत अजिबात लढाई नाही. माढामध्ये आमच्या उमेदवाराला वाढता पाठिंबा मिळू लागल्याने माढामधून शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतली असा दावा त्यांनी केला.
एमआयएमसोबत आघाडी
एसआयएमसोबत केलेल्या आघाडीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, एमआयएमची राजकीय व सामाजिक भूमिका लोकांसमोर आल्यामुळे अनेक लोकांचे एमआयएमबद्दलचे मत बदलले.



























































