
महाविकास आघाडीची मुंबईतील बैठक संपली आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आजची बैठक सकारात्मक वातावरणात झाली आणि यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. आता पुढील बैठक 30 तारखेला होणार आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना वंचित बहुजन आघाडीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, प्रकाश आंबोडकर यांच्याशी आपली आणि वरिष्ठांची चर्चा झाली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी त्यांची मते मांडली. त्यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाली असून त्यांना 30 तारखेला होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. आता 30 तारखेला होणाऱ्या बैठकीत प्रकाश आंबेडकर त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जे काही गैरसमज निर्माण झाले होते, ते या चर्चेतून दूर झाले आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे 30 तारखेच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील, असे नाना पटोले यांनी सांगितले.

























































