
जवानाचा मृत्यू, त्यावेळी लोटणारा जनसागर आणि शासकीय इतमामात होणारा अंत्यसंस्कार या गोष्टी सातारा जिह्याला नवीन नाहीत. मात्र, शनिवारी जिल्हावासीयांना जे पाहायला मिळाले, ते मन विदीर्ण करणारे होते. नुकत्याच जन्मलेल्या अजाण लेकीवर पित्याचे आणि तिला जन्म देणाऱया मातेच्या नशिबी पतीचे अंत्यदर्शन घेतानाचे दृश्य पाहताना सर्वांचेच काळीज चरकले.
सीमेवर लडाख येथे तैनात असलेले सातारा तालुक्यातील परळी खोऱयातील दरे, पो. आरे येथील जवान प्रमोद परशुराम जाधव (वय 32) हे पत्नीच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आल्यामुळे सुट्टी काढून गावी आले होते. घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणार म्हणून जाधव कुटुंब आनंदात होते. मात्र, विधात्याच्या मनात काही वेगळेच होते. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास सातारा येथील बंगळुरू महामार्गावर दुचाकीवरून येत असताना भीषण अपघात झाला. समोरून येणाऱया टेम्पोला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. यात प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुसऱया दुचाकीवरील दोघे युवकही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. या घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
प्रमोद जाधव यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही तासातच, म्हणजे शनिवारी सकाळी त्यांच्या पत्नीची प्रसूती होऊन त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. ज्या लेकीच्या स्वागतासाठी जवान प्रमोद सुट्टीवर आले होते, तिचे तोंड पाहण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने उपस्थितांची मने हेलावून गेली. जवान प्रमोद जाधव यांच्या पश्चात पत्नी, वडील आणि नवजात कन्या असा परिवार आहे.
दरम्यान, शनिवारी जवान प्रमोद जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी जाधव कुटुंबाचा आकांत हृदय पिळवटून टाकणारा होता. पण नंतरचे दृश्य पाहून सर्वांचेच काळीज चरकले. चितेवरील पतीच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या पत्नीला थेट रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवरून आणण्यात आले. नवजात मुलीला मुलायम कापडात लपेटून पित्याचे दर्शन घडवण्यात आले. पतीचे पार्थिव पाहून पत्नीच्या दुःखाला पारावार राहिला नाही. तिच्या पायाखालची जमीनच जणू सरकली होती. आपल्याला मुलगी झाली हे आता सांगायचे कोणाला? कारण त्या आतुरतेने आलेला आयुष्याचा सोबती शेवटच्या प्रवासाला निघाला होता. हे दृश्य पाहून जमलेल्यांची मने अक्षरशः विदीर्ण झाली.





























































