आगामी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी

>> प्रणव पाटील

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – स्त्री ते देवत्वापर्यंतचा प्रवास’ या अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित या गौरवग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यानिमित्त…
2025 हे वर्ष अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष म्हणून भारतभर साजरं केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवींवर एक गौरव ग्रंथ काढावा अशी कल्पना पुढे आली. या विशेष ग्रंथाचे संपादन करताना मराठय़ांच्या इतिहासाचा आणि अहिल्यादेवींच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाचा एक काळ जाणून घेण्याची संधी मिळाली. या व्यक्तिमत्त्वाची भुरळ आज जशी समस्त भारतीयांना आहे, तशीच ती त्याकाळात एका इंग्रज अधिकाऱयाला पडली होती. हा इंग्रज म्हणजे अहिल्यादेवींच्या कारकीर्दीनंतर वीस-पंचवीस वर्षांनी माळव्यात आलेल्या जॉन माल्कम हा होय. त्याकाळातही देशभर अहिल्यादेवींचे नाव सतत कानावर पडल्यामुळे माल्कमने चिकित्सकपणे या विषयातली माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने अहिल्यादेवींच्या सहवासात राहिलेल्या, त्यांना पाहिलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्याने लिहून ठेवलं आहे की, ‘अहिल्याबाईंच्या बद्दल मी जितकी जास्त चौकशी करतो तितकी त्यांच्या विषयीची समाजातील श्रद्धा मला जाणवते.’ यासंदर्भातला एक प्रसंग माल्कमने 1832 साली प्रकाशित केलेल्या त्याच्या ‘Memoir of Central India Including Malwa’ या पुस्तकात दिला आहे.

अहिल्यादेवींचे कार्य आपण जेव्हा पाहतो तेव्हा एकीकडे देशभर चाललेलं मंदिर, घाट, अन्नछत्र यांचं काम आणि दुसरीकडे सभोवताली असलेलं अराजक, गृहकलह, कट-कारस्थान या सगळ्याला त्या पुरून उरल्या. त्यामुळे होळकरांच्या कैफियतीत म्हटलं आहे की, ‘अहिल्याबाई पुण्यवान आणि कारस्थानी दोन्ही अंगे एकसारखी.’ यात कारस्थानी हा शब्द मुरलेली राजकारणी या अर्थाने आला आहे. धार्मिक काम सुरू असतानाच राज्यकारभारावर अहिल्यादेवींचे बारीक लक्ष होतं. कामात हयगय करणाऱया प्रांत अधिकाऱयांना त्या वेळप्रसंगी ताकीद पत्र लिहीत असत. त्यांच्या राज्यात जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाय लगेच केला जाई. त्यांनी विधवा स्त्रियांना दत्तक मुलगा घेताना निवडीचा अधिकार दिला. भिल्लांच्या वाटमारी बंद करून त्यांना स्थिर जीवनात आणण्याचा प्रयत्न केला.

प्रजेच्या मनात अहिल्यादेवी देवत्वापर्यंत पोहोचल्या होत्याच तशाच त्या त्यांच्या शत्रूच्या मनातही आदराचं स्थान राखून होत्या. प्रजेला आपल्या मुलांच्या प्रमाणे मानून त्यांची काळजी घेणाऱया त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनानंतर काही वर्षांनी जेव्हा इंग्रजांनी होळकरशाही जिंकून घेतली, त्या वेळी होळकरांचे कारभारी तात्या जोग हे होते. या ग्रंथात अहिल्यादेवींच्या चरित्राचे विविध पैलू दाखवणरे एकूण सहा विभाग करण्यात आले आहेत. पहिला विभाग पूर्वपीठिका म्हणजेच होळकर घराण्याचा पूर्वेतिहास सांगणारा आहे. यातील पहिला लेख होळकरांच्या पूर्वजांची माहिती सांगणारा आहे. यात होळकरांचे घराणे, अहिल्यादेवींच्या पती खंडेराव आणि मल्हाररावांची शिकवण यावर लेख आहेत.

ग्रंथातील दुसरा विभाग हा मालेराव होळकरांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सत्तेवर आल्यानंतरचा आहे. सत्तेवर आल्यावर अहिल्यादेवींना गृहकलहाला सामोरं जावं लागलं, त्याच जोडीला लुटारू भिल्लांची व्यवस्था करावी लागली. दुसरीकडे त्यांनी पाश्चात्य शैलीचं सैन्य उभं केलं होतं, तर प्रजेसाठी महेश्वरच्या वस्त्र उद्योगावर केलेली उभारणी याविषयीचे लेख आहेत. ग्रंथातील पुढील विभाग हा अहिल्यादेवींच्या कार्यामुळे झालेल्या सांस्कृतिक पुनरुत्थान या विषयाशी निगडित आहेत. यात अप्रकाशित आणि प्रकशित शिलालेख, अप्रकाशित पत्रे, होळकरांची नाणी, अहिल्यादेवींशी संबंधित लोककथा आणि साहित्याशी संबंधित आहे. काव्य विभागात अहिल्यादेवींच्या समकालीन असलेल्या पंडितांचे, शाहीरांचे निवडक काव्य समाविष्ट केल्यामुळे या ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढले आहे.

ग्रंथाच्या शेवटच्या भागात मध्य भारतातल्या अहिल्योत्सव परंपरेवर आधारित लेख असून त्यातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर नव्याने प्रकाश पडला आहे. प्रस्तुत ग्रंथातील विषयाचं वैविध्य आणि विभागवार रचना यामुळे संदर्भ मूल्य असणारा महत्वाचा ग्रंथ ठरला आहे. सर्व विषयांचे अवलोकन केल्यानंतर अहिल्यादेवींच्या कार्याविषयी इंदोरचे विद्वान माधवराव किबे यांचे शब्द आठवल्याशिवाय राहत नाही, ते असे ‘पहिल्या माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत उत्तरेस महादजी व दक्षिणेस पटवर्धन आदी त्यांच्या सेनापतींच्या अमलात मराठय़ांच्या साम्राज्याच्या सीमांचा राजकीय विस्तार झाला, परंतु अहिल्याबाईने धार्मिक, मानसिक, आणि बौद्धिक रीतीने त्याचा संपूर्ण भारतभर प्रसार केला आणि पहिले नामशेष झाले तरी दुसरे आजतागायत टिकाव धरून राहिले आहे.’

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
संपादक ः प्रणव पाटील
प्रकाशक ः कृष्णा प्रकाशन, पुणे
किंमत ः 999 रुपये.