
शब्दांकनः रश्मी पाटकर - फडके
मराठी कला विश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. अभिनयासोबत लेखन, दिग्दर्शन, गायन, सूत्रसंचालन या क्षेत्रातही भरीव कामगिरी करत त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवलं. प्रत्येक भूमिका अभ्यासपूर्वक साकारणाऱया प्रसादने आयुष्यात पहिल्यांदा कॅमेऱयासमोर जाताना मात्र भूमिकेसाठी कोणतीही तयारी केली नव्हती, तरीही आपण पास झाल्याचा किस्सा त्याने सांगितला.
माझी आणि कॅमेऱयाची पहिली भेट झाली ती 1995-96 मध्ये. तेव्हा दूरदर्शनवर ‘आवर्त’ ही मालिका सुरू होती. शिरीष देशपांडे दिग्दर्शित या मालिकेसाठी पुण्यात ऑडिशन सुरु झाल्या होत्या. एका हॉटेलमध्ये मी ऑडिशन दिली अन् माझी भूमिकेसाठी निवड झाली. त्यांनी मला लगेच दुसऱयाच दिवशी चित्रीकरणाला सुरुवात होणार असं सांगितलं. त्यामुळे मला भूमिकेची तयारी करण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नव्हता.
निगेटिव्ह शेड असलेल्या एका कॉलेजवयीन तरुणाची ती भूमिका होती. या मालिकेत माझ्यासोबत दिग्गज अभिनेत्री मृणाल कुलकर्णी होती. मी तिला त्रास देणाऱया मुलाच्या भूमिकेत होतो. नंतर ती त्याच्यात सुधारणा घडवून आणते, अशा पद्धतीचं ते कथानक होतं. शूटिंगवेळी पहिल्यांदा कॅमेरासमोर उभा राहिलो तेव्हा खरं सांगायचं तर मनात काही विचार नव्हते. तयारी केली नव्हती. पण एकांकिका आणि व्यावसायिक नाटकांचा अनुभव गाठीशी होता. काही चुकलंच तर दिग्दर्शक सांगतील, असा सकारात्मक विचार करून मी टेक दिला. देवाच्या कृपेने माझा पहिलाच टेक ओके झाला. अशाप्रकारे तयारीशिवाय देखील मी पास झालो.
कलाकाराच्या आयुष्यात कॅमेरा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. अभिनय आणि कलाकार म्हणून असलेलं त्याचं अस्तित्व कॅमेरामुळे नावारूपाला येतं. कॅमेऱयासमोर दिलेला पहिला टेक आणि तिथे पोहोचण्यासाठी करावा लागलेला प्रवास याची गोष्ट सांगणारं सदर फर्स्ट टेक!






















































